पी.चिदंबरम यांना दिलासा नाहीच; सुप्रीम कोर्टाकडून हाय कोर्टाचा निर्णय कायम

0

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर आहेत. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांना दिलासा मिळालेला नाही. आज बुधवारी सकाळी झालेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच हे प्रकरण सुनावणीसाठी सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आले असून, सरन्यायाधीश दुपारी चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर निर्णय देण्याची शक्यता आहे.

पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति याच्याशी संबंधित ‘आयएनएक्स मीडिया कंपनी’त विदेशी गुंतवणुकीस परवानगी देताना झालेल्या कथित गैरव्यवहारांवरून त्यांच्याविरोधात खटला सुरु आहे. काल मंगळवारी उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर, कालच त्यांनी तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयामधूनही दिलासा मिळाला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच या प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या न्यायमूर्ती एन. व्ही. रामना यांनी हे प्रकरण निर्णयासाठी सरन्यायाधीशांकडे वर्ग केले आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी सरन्यायाधीश निर्णय देतील.

दरम्यान आता पी. चिदंबरम अडचणीत असतांना कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी चिदंबरम यांची पाठराखण केली आहे. चिदंबरम हे नेहमी सत्य बोलतात, सरकारवर टीका करतात म्हणून सरकारकडून हेतुपुरस्सर त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.