पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप दुसर्‍या फेरीत

0

सेऊल । भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि पारुपल्ली कश्यप यांनी पहिल्या फेरीचा अडथळा पार करत कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या एकेरी लढतीत दुसर्‍या फेरीत स्थान मिळवले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत रौप्यपदक जिंकणार्‍या सिंधूने बुधवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत 17 व्या मानांकित चेऊंग नगानवर विजय मिळवला.

सिंधूने हा सामना 21-13, 21-8 अशा फरकाने जिंकला. दुसर्‍या फेरीत सिंधूचा सामना थायलंडच्या नितचाओन जिंदापॉलशी होईल. भारताच्या प्रणव चोपडा आणि एन.सिक्की रेड्डी या मिश्र दुहेरीतील जोडीला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

पुरुषांच्या एकेरीच्या लढतीत पी. कश्यपने चायनीज तैपईच्या के सु जेन हाओचा 21-13, 21-16 असा सरळ पराभव केला. दुसर्‍या फेरीत कश्यपसमोर अव्वल मानांकित कोरियाच्या सोन वॉनचे आव्हान असेल. त्याआधी कश्यपने पात्रता फेरीतले दोन्ही सामने जिंकून स्पर्धेच्या मेन ड्रॉमध्ये स्थान मिळवले होते.पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात चायनिज तैपईच्या लिन यु सिनचा 21-19, 21-19 असा पराभव केला होता. दुसर्‍या फेरीत कश्यपने चायनिज तैपईच्या कान चाओ युवर 21-19, 21-18 असा विजय मिळवत मेन ड्रॉमधील स्थान निश्‍चित केले होते. कश्यपच्या जोडीने मिश्र दुहेरीतील अश्‍विनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीनेही पात्रता फेरीतील दोन्ही सामने जिंकून मेन ड्रॉमध्ये जागा मिळवली होती.