पुजाराने दाखवला दम

0

कोलकाता । इडन गार्डनच्या गवत राखलेल्या खेळपट्टीवर एकीकडे इतर भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना चेतेश्‍वर पुजाराने मात्र एकाग्रता आणि संयमी खेळीचा चांगला नमुना पेश करत एकाबाजूने संघाचा डाव सावरुन धरला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रभावीत झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दासुन शनाकाने दोन विकेट्स मिळवल्यामुळे भारताच्या 5 बाद 74 धावा झाल्या आहेत. कोलकात्यातील पावसाळी हवामानात गवत असलेल्या खेळपट्टीवर केवळ पुजाराने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. बचावात्मक खेळाचे चांगले उदाहरण युवा खेळाडूंसमोर ठेवताना पुजाराने केवळ खराब चेंडूंवरच धावा जमवल्या. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 47 धावांवर खेळत होता. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताने पहिल्या डावातील धावसंख्येत 57 धावांची भर टाकली. पहिल्या दिवशी भारताची 3 बाद 17 धावा अशी घसरगुंडी उडाली होती. शुक्रवारी सकाळी भारतानेर अजिंक्य रहाणे (4) आणि रविचंद्रन अश्‍विनची (4) विकेट झटपट गमावली. या दोघांना शनाकाने बाद केले. दुसर्‍या दिवशी पावसामुळे उपाहराची वेळही बदलण्यात आली. निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे आधी उपाहाराची घोषणा करण्यात आली. पहिल्या दिवशी केवळ 11.5 षटकांचा खेळ झाला होता. दुसर्‍या दिवशी केवळ 21 षटकांचा खेळ झाला. दुसर्‍या दिवसअखेर पुजारासह विकेटकिपर रिद्धीमान साहा 6 धावांवर खेळत होता.

पुजाराची शानदार खेळी
शुक्रवारी सकाळी पुजारा आठ धावांवर खेळण्यास मैदानात आला. त्याने 102 चेंडूचा सामना करत आपल्या नाबाद 47 धावांच्या खेळीत नऊ वेळा चेंडू सिमापार पाठवले. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या पुजाराने कमालीचा संयम राखत संघाचा डाव पुढे नेला. पुजारा 24 धावांवर खेळत असताना त्याच्या हाताच्या खालच्या बाजुला चेडु आदळला होता. डावातील 25 व्या षटकात, लाहिरु गामेगाचा आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्या हातावर आदळला होता. हा फटका इतका जोरदार होता की, पुजाराने लगेचच हातातले ग्लोव्हजही काढून टाकले होते.

सौरव गांगुलीची भविष्यवाणी
कोलकात्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान सौरव गांगुलीने एक भविष्यवाणी केली आहे. इडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेला सामना पावसामुळे उशीरा सुरु झाला. पहिल्या दिवशी अवघ्या 17 धावांवरच भारताने तीन विकेट्स गमावल्या होत्या. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या संदर्भात सौरव गांगुलीला विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना गांगुलीने म्हटले की, मी तुम्हाला एक सांगतो जरी भारतीय संघाने 17 धावांवर तीन विकेट्स गमावल्या असल्या ती हा सामना भारतच जिंकेल. ज्यावेळी गांगुलीला हा प्रश्‍न विचारला त्यावेळी भारताची धावसंख्या 17 धावांवर तीन विकेट्स अशी होती. तर आता दुसर्‍या दिवशी भारताच्या 74 धावा झाल्याअसून त्यांचे पाच फलंदाज बाद झाले आहेत. कोलकातामध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे.

पावसाचा व्यत्यय
भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोलकाता टेस्टच्या दुस-या दिवशीही पावसानं व्यत्यय आणला. पाऊस आणि अपुर्‍या प्रकाशामुळे दुसर्‍या दिवसाचा खेळ दोन तास आधीच थांबवण्यात आला. दुसर्‍या दिवसअखेर भारतानं 5 विकेट्स गमावत 74 रन्स केल्या ओहत. पावसामुळे मॅच 33 व्या ओव्हर्सनंतर थांबवण्यात आली. अजिंक्य रहाणे आणि आर. अश्‍विन प्रत्येकी 4 रन्सवर आऊट झाले. अजिक्य रहाणे आणि रविचंद्र अश्‍विन या दोघांनाही दासून शानाकानं आऊट केलं. सध्या चेतेश्‍वर पुजारा 47 तर वृद्धिमान साहा 6 रन्सवर नॉट आऊट आहेत.