पुजारा, जडेजा दुसर्‍या स्थानावर

0

नवी दिल्ली । श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यातील शतकी खेळीच्या जोरावर चेतेश्‍वर पुजारा आयसीसी कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धटच्या दुसर्‍या कसोटीत पुजाराने 143 धावांची दमदार खेळी केली होती. पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा यांची शतकी खेळी आणि कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकानंतर भारताने श्रीलंकेला डावासह 239 धावांनी पराभूत केले होते.भारत-श्रीलंका आणि इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आयसीसीने जारी केलेल्या क्रमवारीत पुजाराने 22 गुणांसह दोन स्थानांनी झेप घेत दुसरे स्थान पटकावले. पुजाराच्या नावे आता 888 गुण आहेत. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ 941 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पुजाराशिवाय रवींद्र जाडेजाने गोलंदाजी आणि अष्टपैलू कसोटी क्रिकेटपटू म्हणून दुसरे स्थान पटकावले आहे.

अष्टपैलू खेळाडूच्या यादीत बांगलादेशचा शाकिब हसन 437 गुणांसह अव्वल स्थानी असून जाडेजा (414) आणि आर अश्‍विन 388 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत विक्रमी 300 बळींचा टप्पा पार करणार्‍या अश्‍विनला गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 849 गुणासह त्याने चौथे स्थान पटकावले. नागपूरच्या मैदानात कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकवणाऱा भारताचा कर्णधार विराटला अव्वल पाच फलंदाजामध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. कोहली 877 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

इतरांची झाली घसरण
भारताचा दुसरा सलामीवीर मुरली विजय 28व्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा या क्रमवारीत 46व्या स्थानी आहे. लोकेश राहुल नवव्या, अजिंक्य रहाणे 15व्या स्थानी आहेत, तर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने 18 व्या आणि शिखर धवन 29व्या स्थानावर घसरलेत. गोलंदाजीतील क्रमवारीत रवींद्र जडेजा दुसर्‍या स्थानावर आहे. तर मिशेल स्टार्क 10व्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 84 धावात 5 बळी टिपणार्‍या जाडेजाने 880 गुण मिळवले आहेत. गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने अव्वल स्थान कायम राखले. मात्र, अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत केवळ दोन विकेट्स मिळल्यामुळे त्याच्या एकूण गुणांमध्ये 5 अंकांची घसरण झाली आहे. तो 891 गुणांसह अव्वलस्थानी आहे.