पंढरपूर : दोन पुजार्यांच्या भांडणामध्ये देवी रुख्मिणी तब्बल एक तासभर उपाशी राहिल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या घटनेने वारकरी संप्रदयात संतापाची लाट उसळली असून, देवाला उपाशी ठेवणार्या पुजार्यांवर कारवाईची मागणी पुढे आली आहे. प्रथेप्रमाणे रुख्मिणीदेवीचा नैवेद्य सकाळी साडेदहा वाजता मंदिरात नेण्यात आला. परंतु, देवीला हा नैवेद्य कुणी दाखवायचा यातून या दोघांत भांडण जुंपले. त्यात देवीला तासभर उपाशी राहात या दोघांची भांडणे पहावी लागली.
रुख्मिणीदेवीसमोरच पुजार्यांचा गोंधळ
सविस्तर असे, दररोजप्रमाणे गुरुवारीही रुख्मिणी देवीचा नेवैद्य सकाळी साडेदहा वाजता तयार करुन देवीच्या गाभार्यात नेण्यात आला. नेवैद्य पोहोचल्यानंतर तेथे ताठे आणि गुरव नामक दोन पुजारी उपस्थित होते. परंतु, आज दोघांपैकी कोणाची ड्युटी आहे हे दोघांनाही माहिती नव्हते. नेवैद्य कोण दाखविणार यावरून वादावादी सुरु झाली. तुला पुजा करता येत नाही, मला येते. तुला कोणी नेमले, अशी एकमेकांची माप काढण्यात आली. विशेष म्हणजे, देवी रुख्मिणीसमोरच हे भांडण चांगलेच रंगले होते. या वादावादीमध्ये जवळपास एक तास गेला. तोपर्यंत देवी उपाशीच राहिल्यात. त्यामुळे देवींना नैवेद्य न दाखविता त्यांच्यासमोरच गोंधळ घालणार्या पुजार्यांवर कारवाईची मागणी पुढे आली आहे.
दररोजच्या भांडणांना देवही कंटाळले!
मंदिरामध्ये भांडणे ही नित्याचीच झाली आहेत. कधी भाविकविरूध्द पुजारी, कधी पुजारीविरूध्द पुजारी तर कधी समितीचे अधिकारी विरूध्द एजेंट अशी भांडणे सारा महाराष्ट्र याची देही याची डोळा पाहत आहे. पंढरपूर येथे विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासाठी नवीन समिती सरकारने नियुक्त केली. तडाखेबाज, तरुण असे अध्यक्ष सरकारने दिले. तीन स्थानिक सदस्य दिले. मात्र अध्यक्षांनी शहर विकासात लक्ष घातल्याने मंदिरात शिस्त लागण्यासाठी सहअध्यक्ष आवश्यक असल्याचे मत भाविकांमधून आता व्यक्त होत आहे. देवाचा नेवैद्य हा पुजार्यांसाठी ’प्रसाद’ असल्याचे बोलले जात आहे. मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवार यांनी या प्रकरणाची माहिती घेवून कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे.