पुणे । गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला…अशा घोषणा देत सात दिवसांच्या गौरी-गणपतींना गुरुवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणरायाच्या आगमनामुळे गेले सहा दिवस घराघरांत हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते. या लाडक्या बाप्पांचे भक्तांनी विधिवत विसर्जन केले. तसेच दोन दिवस माहेरी आलेल्या लाडक्या गौराईंचीदेखिल पाठवणी करण्यात आली.
विसर्जन घाट गर्दीने फुलले
गणेश विर्सजनासाठी सकाळपासून संगम घाट, नाणे आपटे घाट, अष्टभुजा मंदिर, नारायण पेठ येथील बापू घाट, पुलाची वाडी, राजाराम पूल घाट, एस. एम. जोशी घाट, औंधगाव घाट, चिमा उद्यान, बंडगार्डन घाट, वारजे, कर्वेनगर परिसरात सकाळपासून नागरीकांनी गणपती विर्सजनासाठी गर्दी केली होती. बाप्पांना निरोप देण्यासाठी लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनीच हजेरी लावली होती.
ढोल-ताशांचा गजर आणि गुलालची उधळण
ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या तालावर ठेका धरत गुलालची उधळण केली जात होती. मिरवणुका सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. बर्याच विसर्जन मिरवणूका या रथ, कारमधून येत होत्या. विर्सजन घाटाचा परिसर गणपती बाप्पा मोरया, आणि सुखकर्ता-दुखःहर्ता या मंगलमय आरतीने दुमदुमून गेला होता. पारंपरिकपद्धतीने म्हणजेच नदीत विर्सजन करण्याचा भाविकांचा कल जास्त होता. तर विर्सजनासाठी बांधण्यात आलेल्या हौदातदेखिल गौरी-गणपतींचे विर्सजन करण्यात आले.
चोख बंदोबस्त
नदीला पाणी सोडण्यात आल्याने नागरीकांना नदीजवळ जाण्याची परवानगी नव्हती. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक घाटावर विर्सजन सोहळा र्निविघ्न पार पाडण्यासाठी पोलिस, पोलिस मित्र, व्हॉलेंटीयरर्स, सुरक्षारक्षक तैनात होते.