पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार

0

मुंबई – आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार आहेत. यामुळे ग्राहकांना पुन्हा अडचणींचा सामाना करावा लागणार आहे. देशभरातील १० लाख कर्मचारी पुढील आठवड्यात ३० आणि ३१ मे रोजी संपावर जात आहेत. यामुळे सरकारी आणि खासगी बँका बंद राहणार असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन तर्फे घोषीत करण्यात आले आहे .अत्यल्प पगारवाढी संदर्भात प्रस्ताव तसेच केंद्र सरकारने न केलेल्या मध्यस्थीमुळे बँक कर्मचारी संघटना नाराज आहे.

विविध मागण्यांसाठी संप 

बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार ३१ ऑक्टोबर २०१७ ला संपला. त्यामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून नवीन करार होणे अपेक्षित होते. इंडियन बँकर असोसिएशन व कर्मचारी संघटना यांच्यातील या संदर्भात लवकर चर्चा व्हावी, नवी वेतनवाढ लागू करावी, केंद्र सरकारने बँकर असोसिएशनला सूचना करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. दोन दिवस बँक बंद असल्याने ग्राहकांना एटीएम सेंटरवर अवलंबून राहावे लागणार आहे. पुरेशी रोकड उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी एटीएम मशीनमधे खडकडाट आहे. रोकडला पर्याय म्हणून डिजिटल व्यवहाराचा पर्याय असला तरी तो नगण्य आहे. त्यामुळे वित्त विभागाला आधीच तरतूद करून ठेवावी लागणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटी वार्षिक हिशोब असल्याने चार दिवस तर एप्रिल महिन्यात सलग सुट्ट्या आल्याने बँका बंद होत्या. या महिन्यात संप असल्याने बँका बंद असणार आहेत. अशा प्रकारे सलग तीन महिने लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या.