पुणे (प्रतिनिधी) – मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवसात वादळी पावसासह गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दोन दिवसांपूर्वीही या भागात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने हातात आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, राज्याच्या कृषिविभागाने शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान जोरदार पावसासह गारपिटीचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला होता. राज्य सरकारनेदेखील शेतकर्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या.
शेतकर्यांना सतर्कतेच्या सूचना
हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र व परिसरात सद्या वादळसदृश स्थिती निर्माण झाला असून, ही सायक्लोन स्थिती समुद्रसपाटीपासून 0.9 किलोमीटर उंचीवर पोहोचली आहे. त्यामुळे वादळी पावसासह गारपिटीची शक्यता निर्माण झालेली आहे. हवामान खात्याकडून अंदाज प्राप्त होताच, राज्य सरकारनेदेखील शेतकर्यांना काळजी घेण्याची सूचना जारी केली आहे. खास करून विदर्भ व मराठवाड्यात शेतमालाचे आणखी नुकसान होण्याची भीती पाहाता, शेतकर्यांनी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांत आणावा, किंवा तो काळजीपूर्वक झाकून ठेवावा, अशी सूचनाही सरकारने केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, लातूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीदेखील या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस व गारपीट झाली आहे.
शहराचे तापमान घसरले
वातावरणात झपाट्याने बदल झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे तापमान 13.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. लोहगाव व पाषाण भागातील तापमान किमान तापमान 15 व 13.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. रात्रीचे तापमान पुढील आणखी काही दिवस कमीच राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविलेला आहे.