पुढील महिन्यात फुल बाजाराच्या कामाला येणार वेग

0

कल्याण : दादरनंतरचा सर्वात मोठा फुलबाजार अशी ख्याती असलेला कल्याण येथील फुलबाजार लवकरच कात टाकणार आहे. सुमारे ७५ कोटी रुपयांची प्रचंड वार्षिक उलाढाल असली, तरी हा बाजार सध्या अत्यंत दुरवस्थेत आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या महासभेत या फुल बाजार पुर्नबांधणीला मंजुरी मिळुन पुढील महिन्यातच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी दिली.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच फुलबाजार अनेक वर्षांपासून भरवला जातो. नाशिक, सिन्नर, आळेफाटा, जुन्नर आदी भागांतून दररोज सुमारे ५० प्रकारची फुले या बाजारात विक्रीसाठी आणली जातात. शहापूर, भिवंडी, कल्याण, मुरबाड व उल्हासनगर या पाच तालुक्यांमधील हजारो किरकोळ फुलविक्रेत्यांचा व्यवसाय या बाजारावरच अवलंबून आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये तसेच लग्नसराईच्या काळात या बाजारातील फुलांची मागणी कितीतरी पटीने वाढते आहे.

सध्याची या बाजाराची परिस्थिती मात्र अत्यंत दयनीय आहे. हा बाजार खोलगट भागात वसलेला असल्याने पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे चिखलातच ३४७ विक्रेत्यांना व्यवसाय करावा लागतो. एरवीदेखील या बाजारात कोणतीही स्वच्छता नसते. त्यामुळे या विक्रेत्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने विक्रेते असले, तरी साधी प्रसाधनगृह व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोयदेखील येथे नाही. फुलांसारखा नाशवंत माल असल्याने कोल्ड स्टोरेजची सोय तिथे अत्यावश्यक आहे. मात्र तीदेखील नाही. या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत फुलबाजाराच्या विकासाचा १६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. यानुसार, पालिका फुलबाजाराचे बांधकाम करून तिथे विक्रेत्यांना जोते उपलब्ध करून देणार आहे. तसेच प्रसाधनगृह, कोल्ड स्टोरेज आदी सुविधादेखील दिल्या जातील. कोल्ड स्टोरेजमुळे सुमारे १५ दिवस फुले ताजी राहणार असून त्याचा फायदा विक्रेत्यांना चांगला भाव मिळण्यात होण्याची अपेक्षा आहे. बाजार समितीने नव्या फुलबाजाराचा आराखडा व नकाशांना केडीएमसीची मंजुरी मिळवली आहे. अंतिम मान्यतेसाठी तो पणन विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिली. पुढील महिनाभरात या बाजाराचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. फुलविक्रेत्यांकडून या बाजाराच्या बांधकामासाठी निधी उभारला जाणार आहे. या सर्व सुविधांनंतर या बाजारातील उलाढाल किमान निम्म्याने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.