पुढील वर्षापासून ऑस्ट्रेलिया आयपीएल खेळणार

0

नवी दिल्ली । पुढील वर्षापासून आपले प्रमुख खेळाडू आयपीएलमध्ये खेळू नये म्हणून ’क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ प्रयत्न करत असले तरी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केला. क्लार्क यंदाच्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहे. खेळाडूंना अमाप पैसा देणारी आयपीएल क्रिकेट विश्‍वातील इतर सर्व क्रिकेट लीगपेक्षा लोकप्रिय आहे. भारतीय क्रिकेट मंडळावर आकस असणार्‍या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉस हेझलवूड अशा पाच प्रमुख खेळाडूंबरोबर तीन वर्षांचा करार करणार आहे. त्यामुळे ते पुढील आयपीएलपासून भारतात खेळू शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात येऊन खेळण्यास उत्सुक असतात. प्रत्येकाला या स्पर्धेत खेळण्यास आवडते. त्यामुळे अशा प्रकारे रोखणे योग्य नाही, असे मत क्लार्कने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात येऊन खेळतील मी तरी नक्की येणार असल्याचे क्लार्कने सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडूंचा आयपीएलशी करार
क्रिकेट हा विश्‍वातील मोठा खेळ आहे आणि त्याची प्रगती अशीच होत राहील. डेव्हिड वॉर्नरही भारतात पुन्हा येईल आणि स्टीव स्मिथही आयपीएलमध्ये पुन्हा येऊन खेळेल, स्मिथ, वॉर्नर, स्टार्क, कमिन्स आणि हेझलवूड यांच्याशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संपर्क साधला असून, तीन वर्षांच्या कराराची त्यांना माहिती दिली आहे, असे वृत्त ’सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने दिले आहे; परंतु खेळाडूने कोणतेही सकारात्मक उत्तर आपल्या मंडळाला दिलेले नाही. हे सर्व खेळाडू असा करार करण्यास उत्सुक नाहीत. आयपीएलमध्ये खेळायचे नसेल तर आम्हाला त्यापेक्षाही अधिक रक्कम मिळाली पाहिजे, असे या खेळाडूंनी आपल्या मंडळाला विश्‍वास व्यक्त करत माहिती सांगितली.