पुढील शैक्षणिक वर्षापासून मोफत पाठ्यपुस्तके बंद

0

पुणे : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके यंदाही शाळेतच मिळणार असून, यंदाचे वर्ष हे शाळेत पुस्तक मिळण्याचे शेवटचे वर्ष असणार आहे. पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. यंदा पुस्तके घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहेत. या दिवशी राज्यभरात पुस्तक दिवस साजरा करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तके देण्याऐवजी थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. मात्र, पाठ्यपुस्तकांच्या या निर्णयाला यंदा स्थगिती देण्यात आली असून, यंदा शाळांमध्येच पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2017- 18 या वर्षात फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात येणार असल्याने हा दिवस पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

वितरणासाठी वेळापत्रक
यंदाचे वर्ष पुस्तके देण्याचे शेवटचे वर्ष असले, तरीही पहिल्याच दिवशी राज्यातील विद्यार्थ्यांना पुस्तक मिळावे यासाठी शाळा स्तरावर एक आठवडा आधीच पुस्तके पोचवली जावीत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यासाठी शासनाने वेळापत्रकही तयार केले आहे.

वितरणाचा व्हिडिओ काढा
शिक्षण विभागाचा सेल्फी हजेरीचा वादग्रस्त निर्णय ताजा असतानाच आता पाठ्यपुस्तकांचे वितरण करताना त्यांचा शक्यतो व्हिडिओ काढा व तो शिक्षण संचालनालयाचा पाठवून द्या, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आता प्रत्येक स्तरावरील अधिकार्‍याने काढायचा का, असा प्रश्न दबक्या आवाजात शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.