पुणे । ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही. ईव्हीएम मॅनेज केले जावू शकते हे या देशातील अनेक मोठे मान्यवर बोलत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा आग्रह सोडून द्यावा आणि पुन्हा एकदा बॅलेटपेपरचा वापर करावा. पेपर मोजायला वेळ लागेल. लोकांच्या शंका घालवण्यासाठी निवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. कर्नाटक राज्याचा निकाल जाहीर झाल्यावर मीडियाशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
विश्लेषण होणे गरजेचे
कर्नाटकमधील येडुरप्पांची प्रतिमा बघितली, त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप बघितले किंवा भाजपचे त्या राज्यातील अस्तित्व पाहिलं तर मर्यादित होतं त्यामुळे आता त्याचं विश्लेषण केलं पाहिजे की,जनता दलामुळे सेक्युलर मतं जी आहेत त्याचा फायदा भाजपला झाला का? किंवा भाजप ज्याठिकाणी कधीही आलं नाही त्या ठिकाणी भाजप येण्याची काय कारणं आहेत. जर जनाधार नसेल आणि तरी तिथे भाजपला बुथवर जास्त मतं मिळाली तर राज ठाकरे यांच्या मतानुसार ईव्हीएमबद्दल शंका घेण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया मीडियाला दिली.
ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात शंका
आज जी आकडेवारी आली आहे ती वस्तुस्थिती आहे. निकाल जाहीर झाले आहेत. जेव्हा जेव्हा पराभव होतो त्यावेळी ईव्हीएमला लोकं दोष देतात. आणि ज्या ज्यावेळी विजय होतो त्यावेळी ईव्हीएमला लोकं विसरतात. त्यामुळे लोकांच्या मनात काहीका असेना ईव्हीएमबद्दल शंका आहे ही वस्तूस्थिती आहे. म्हणून ईव्हीएमचा जो उद्देश होता फेक आणि अत्यंत पारदर्शकपणे निवडणूका व्हाव्यात त्याबद्दलच लोकांची शंका आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याचा विचार करावा. कर्नाटकची वस्तुस्थिती बघितली तर मलाही आश्चर्य वाटत की काँग्रेस इतकी कमी होण्याचं कारण नव्हतं असेही जयंत पाटील म्हणाले.