पुढील 24 तासांत मुसळधार!

0

पुणे : पुढील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, पुणेसह मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. या अंदाजानुसार 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबररोजी पावसाची तीव्रता थोडी कमी होईल; परंतु त्यानंतर पुन्हा पाऊस वेग घेईल, असेही वेधशाळेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

हवामान खात्याचे विश्लेषणप्रमुख ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले, की पुढील आठवड्यात राज्यभरात मुसळधार पाऊस होणार आहे. खास करून कोकण आणि गोवा या भागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या कालावधीत पावसाचा जोर जास्त असेल. सद्या नैऋत्य मोसमी पाऊस मध्य महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशच्या समुद्र किनार्‍यावर स्थिरावला असून, पूर्व व ईशान्य भागासह उत्तरेच्या भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातही जोरदार पावसाचे संकेत वेधशाळेच्यावतीने देण्यात आले आहेत.

पुण्यात पावसाने सरासरी ओलांडली
1 जूनपासून आतापर्यंत पुण्यात 537.70 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, सरासरी पावसाच्या 107.10 मिलीमीटरने हा पाऊस जास्त झालेला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह खडकवासला, पवना आणि पानशेत धरणक्षेत्रात सद्या जोरदार पाऊस पडत असल्याचेही वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले. या जोरदार पावसामुळे या धरणसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. तसेच, टेमघर धरणातही 45 टक्के जलसाठा झाला होता. पुढील दोन-चार दिवसांत सर्व धरणे ओव्हरफ्लो होतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.