पुणं तिथं काय उणं : गर्भपाताचे प्रमाण वाढले!

0

पुणे (माधुरी सरवणकर)  : ‘वन नाईट स्टॅण्ड‘ किंवा असुरक्षित शरीरसंबंध याचे मोठ्या प्रमाणात पेव सद्या शहरातील युवक-युवतींमध्ये फुटले असून, त्यामुळे गर्भ राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील विविध गर्भपात केंद्रांवर गर्भपाताचे प्रमाणही अलिकडे लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे. धक्कादायब बाब म्हणजे, शरीरसंबंधांबाबत पुरेशी जाणिवही नसलेल्या टीन एजमधील मुलींचे प्रमाणही यामध्ये लाक्षणीय आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2016 ते मार्च 2017 या एका वर्षात महापालिका व खासगी गर्भपात केंद्रांत 18 हजार 605 गर्भपात करण्यात आले आहेत. त्यात 15 ते 19 या टीन एजमधील मुलींची संख्या 699 इतकी होती. तर 20 ते 24 या महाविद्यालयीन युवतींची संख्या 5 हजार 382 इतकी आहे. कंडोम, अबॉर्शन पिल्स आणि इतर साधने असतानाही मुलींमध्ये गर्भ राहण्याचे वाढलेले प्रमाण पाहाता, असुरक्षित शरीरसंबंधाकडे युवावर्गाचा ओढा दिसून येत असून, मुलींची स्वच्छंदी प्रवृत्तीही अधोरेखित होत आहे. ‘पुणं तिथं काय उणं‘ या म्हणीचा प्रत्यय येथेही येत आहे.

असुरक्षित शरीरसंबंधाचे प्रमाण वाढले
महापालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित शरीरसंबंधांबाबत वारंवार जनजागृती करूनही पुण्यात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी आलेल्या मुला-मुलींचा असुरक्षित शरीरसंबंधांकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे शारीरिक, सामाजिक आणि मानसिक समस्याही निर्माण झाल्या आहेत. एप्रिल 2016 ते मार्च 2017 पर्यंत 18 हजार 605 विविध वयोगटातील महिलांनी गर्भपात केले आहेत. त्यात 15 ते 19 वयोगटातील 699 किशोरवयीन मुलींनी व 20 ते 24 वयोगटातील 5 हजार 382 तरुणींनी गर्भपात केले होते. तर शून्य ते 15 वयोगटातील मुलींची संख्या 50 इतकी होती. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीने असो की असंमतीने असो ठेवलेले शरीरसंबंध हे गुन्हा असतानाही तशाप्रकारचे शरीरसंबंध ठेवले जात आहेत. गतवर्षी एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये 15 ते 24 वयोगटातील 6,656 तरुणींनी गर्भपात केले असल्याचे निर्दशनास आले आहे.

सरकारीपेक्षा खासगी गर्भपात केंद्रांना पसंती
मुलींचा विवाहपूर्व शरीरसंबंधांचा ओढा ही खरे तर सामाजिक काळजीचा विषय आहे. परंतु, पुण्यासारख्या खुले वातावरण लाभलेल्या शहरात मुलींना अशा संबंधांबाबत फारसे काही वावगे वाटत नाही. सज्ञानपणा लाभलेल्या वयोगटातील मुलींबाबत अशा ओढा नैसर्गिक आहे. परंतु, 15 वयाखालील मुलीही अशा प्रकारच्या संबंधांना राजी होत असतील, तर ती चिंतेची बाब ठरते. कधी प्रेमाच्या आणाभाका घेऊन, कधी नोकरीच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, शाळा-महाविद्यालयांत एकमेकांप्रती निर्माण झालेले आकर्षण, तर क्वचितवेळा आप्तेष्टांकडून होणारे लैंगिक अत्याचार यामुळे दोन भिन्नलिंगींमध्ये शरीरसंबंध येत आहेत. त्यातच ते सुरक्षितपणे होत नसल्याने गर्भ राहण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. तथापि, हा गर्भ समाजमान्य नसल्याने मुली किंवा तरुणींना गर्भपातास सामोरे जावे लागते. शारीरिक व मानसिक वेदना स्वीकारून तरुणी हा पर्याय निवडत आहेत. हाती आलेली माहिती धक्कादायक आहे. 15पेक्षा कमी वयोगटातील सहा मुलींनी शासकीय रुग्णालयात तर 44 मुलींनी खासगी रुग्णालयात गर्भापात केले आहेत. 15 ते 19 वयोगटातील 65 मुलींनी शासकीय तर 634 मुलींनी खासगी रुग्णालयात गर्भपात केले आहेत. तर 20 ते 24 वयोगटातील 423 तरुणींनी शासकीय व 4959 जणींनी खासगी रुग्णालयांत गर्भपात केले आहेत.

हिंदू तरुणी आघाडीवर!
एप्रिल 2016 ते मार्च 2017 ची आकडेवारी पाहता, 18 हजार 605 गर्भपात केलेल्या महिलांपैकी 17 हजार 182 महिला हिंदू असल्याचे नोंद आहे, या पाठोपाठ मुस्लीम महिला असून, त्यांची संख्या 1267 इतकी आहे. तर शीख 102, ख्रिश्चन 28 व इतर 26 महिलांचा समावेश आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2017 पर्यंत 17 हजार 958 महिलांनी 1 ते 12 आठवड्याचे गर्भपात केले आहे. व 647 महिलांनी 13 ते 20 आठवड्याचे गर्भपात केले आहेत.

‘जी ले यार! चुकीचेच!
अलिकडे सज्ञान झालेल्या आणि शिक्षण, नोकरीनिमित्त पुण्यात आलेल्या मुला-मुलींची ‘जगून घे‘ (जी ले यार!!) ही प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे त्यांना शारीरिक जवळकीचे काहीच वाटत नाही. कायद्यानुसार, 20 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा गर्भपात हा बेकायदेशीर आहे. त्यामुळे गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुली ताबडतोब ठराविक दवाखाने गाठतात. सरासरी 12 आठवड्यांच्याआतचे गर्भ पाडले जातात. ठराविक कालावधीनंतर मुलींच्या मनात मात्र अपराधी भावना निर्माण होते. तिची संबंधित मुलाकडून फसवणूक झाल्याचे तिला वाटत राहाते. त्यातून अनेकवेळा या मुली आत्महत्येचा प्रयत्नही करतात. त्यामुळे जी ले यार ठीक आहे. परंतु, त्यातून भावनिक कोंडी होते, हे मुलींनी लक्षात घ्यायला हवे!