पुणेकरांचा पोस्टर्समधून भाजपावर निशाणा

0

पुणे : पुण्यात पाण्यावरुन राजकारण पुन्हा तापलेले दिसत आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपावर टीका करणारे पोस्टर्स पुणे शहरात लावण्यात आले आहेत. ”गल्ली ते दिल्ली तुमचा थाट… शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्याची लावली वाट”, अशा आशयाची पोस्टरबाजी करत पुणेकरांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असताना पुणेकरांना हक्काचे पाणी मिळत नाही. पुण्याच्या पाणी पुरवठ्याची पूर्ती वाट लागली असताना गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजपा कोणतीही ठोस भूमिक घेत नसल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या पूर्वसूचना न देता पुणेकरांचे पाणी तोडल्यास पोलिसांकडे तक्रार करणार, असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. जलसंपदा विभागाला पाणी कपात करायची असेल तर मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात यावा. तो पर्यंत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेऊ नयेत. पुणेकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन देखील टिळक यांनी केले होते. पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपकडून पाणी प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याने ही पोस्टरबाजी करण्यात आल्याची चर्चा एकण्यास मिळत आहे.