पुणेकरांचे पाणी कमी होणार!

0

पाणी पुरवठ्यात कपातीची पालकमंत्री गिरीश बापट यांची घोषणा
पुणेकरांच्या पाणीवापरावर राज्यमंत्री शिवतारेही संतापले

पुणे : पुणेकर सर्वाधिक पाणी वापरतात असा आरोप जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला. पुण्याच्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी शहराला देण्यात येणार्‍या पाणीसाठ्याविषयीची माहिती दिल्यानंतर शिवतारे यांनी हा संताप व्यक्त केला. याच बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणात सध्या 13.75 टीएमसी पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत धरणातून पुणे शहराला 1650 एमएलडी पाणी दिले जात आहे. यामध्ये कपात करण्यात आली असून, यापुढे 1350 एमएलडी इतकेच पाणी शहराला दररोज दिले जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात होत असल्याचे ना. बापट यांनी सांगितले.

कालवा समितीच्या बैठकीत पुणेकरांच्या पाणी वापरावर बोट
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक पार पडली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषद विश्‍वास देवकाते, राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणे, विजय काळे, भीमराव तापकीर तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणातून 47 टक्के पाणी मिळते असे अधिकार्‍यांनी सांगितल्यावर ना. शिवतारे काहीसे आक्रमक झाले होते. सद्यस्थितीत पुण्याला धरणातून 1650 एमएलडी पाणी मिळते. हे प्रमाण कमी करण्यात यावे अशी मागणी शिवतारे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. त्यावर बापट यानीही संमती देत शहराला 1350 एमएलडी पाणी देण्यात येईल, असे जाहीर केले. बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीच्या बैठकीत योग्य ते नियोजन करुन पाणीकपात कऱण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पीएमआरडीएने स्वतःचे स्त्रोत विकसित करावेत!
पाण्याच्या गळतीचे प्रमाण वाढले असून, त्यावर विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे वेळीच योग्य ते नियंत्रण आणून शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत गटनेत्याची बैठक घ्यावी अशी सूचनाही बापट यांनी महापौर मुक्ता टिळक यांना केली. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणांमधील पाण्याची बचत करून आणि धरणक्षमता वाढवून पीएमआरडीएला तीन टीएमसी पाणी दिले जाईल. मात्र, पीएमआरडीएने स्वतः पाण्याचे स्रोत विकसित करावेत, पाणी पुरवठ्यासाठीच्या योजना राबवाव्यात अशी सूचनाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.

दौंड, इंदापूरला 7.10 टीएमसी पाणी
दोन उन्हाळी आर्वतनातून दौंड, इंदापूरला शेती व पिण्यासाठी 7.10 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतलेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. चालूवर्षी राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने सर्व धरणे 100 टक्के भरली होती. यामुळे एप्रिल उजाडला तरी पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पांतील धरणांमध्ये एकूण आजअखेर 14 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील 7.10 टीएमसी पाणी दौंड, इंदापूर, हवेली तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधून दोन आर्वतन देण्यात येणार आहे. पहिले आर्वतन 55 दिवसांचे तर दुसरे आर्वतन 20 मेपासून सोडण्यात येणार आहे. तर 6 टीएमसी पिण्यासाठी महापालिकेसाठी राखीव ठेवले आहे. तर उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता सुमारे 1 टीएमसीपर्यंत पाण्याचे बाष्पीभवन होईल, असे पाण्याचे नियोजन केले आहे.