पुणेकरांच्या डोक्यावरील हेल्मेटचे भूत काढा – महादेव बाबर

0

शिवसेनेने हेल्मेटविरोधात काढली अंत्ययात्रा

हडपसर : निवडणुकीत मोठमोठी आश्‍वासने देऊन रोजगार निर्माण करणारे, काळे पैसे भारतात आणणार अशा वल्गना करत भारतीयांची फसवणूक केली आहे, मोदी सरकार व फडणवीस सरकार यांनी नागरी प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केलेले असताना पुणेकरांच्या डोक्यावर हेल्मेट टाकून पुन्हा एकदा पुणेकरांना छळण्याचे काम सुरू केले आहे आम्ही हे सहन करणार नाही, हेल्मेटसक्ती रद्द झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख, माजी आमदार महादेव बाबर यांनी दिला.

पुणे शहरात हेल्मेट सक्ती लागू केल्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने येथील कोंढवा चौकात हेल्मेटची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला. या सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला यावेळी झालेल्या आंदोलन प्रसंगी उपशहर प्रमुख समीर तुपे, माजी नगरसेवक विजय देशमुख, संघटक अमोल हरपळे, प्रसाद बाबर, संजय सपकाळ, महेंद्र भोजने, दत्ता घोडके गणेश कामठे, श्रीकांत पवार, पप्पू जांगड, प्रदीप पवार, रमेश शिंदे, स्वप्नील कामठे, किरण ठोसर, यांच्यासह महिला पदाधिकारी स्मिता दातार, धनश्री बोराडे, वत्सला घुले, सुशीला भोसले, शरीफा सय्यद, अनिता जांभुळकर, बसंती शिरसागर, वैशाली बाबर, सारिका परदेशी यांच्यासह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटची अंतयात्रा कोंढवा रस्त्यावर काढण्यात आली तसेच हेल्मेट जाळून सरकारचा निषेध करण्यात आला.

विकास कामांच्या केवळ वल्गनाच

हडपसरमधील एका कार्यक्रमात पालकमंत्री बापट व आमदार टिळेकर यांनी खासदार आढळराव पाटील यांच्यावर टीका केली होती, या पार्श्‍वभूमीवर तीव्र शब्दांत माजी आमदार महादेव बाबर यांनी टीका करून सांगितले की शिवसेना खासदार तीन वेळा निवडून आले त्यांनी विकास कामे केली. आमदार पदाच्या काळात आम्ही कामे केली असे असताना भाजपचे आमदार विकास कामांच्या वल्गना करतात व पालकमंत्री येथे येऊन खोटं बोलतात. पुणेकरांची सुरू असलेली फसवणूक थांबवा विकासाकडे लक्ष द्या! आठ आमदार करतात काय? असा सवाल करीत बाबर यांनी पालकमंत्री गिरीश बापट व आमदार योगेश टिळेकर यांच्यावर ताशेरे ओढले.