पुणे । आम्ही पुणेकर संस्थेतर्फे 16 एम. एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होणार आहे. शनिवार, दिनांक 20 व रविवार, दिनांक 21 जानेवारी रोजी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या ऑडिटोरियमध्ये हा महोत्सव होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती संस्थेचे हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. राजेंद्र खेडेकर, अॅड. मिलींद पवार, आण्णा देशपांडे, संजय गायकवाड, निकीता मोघे, चित्रपट दिग्दर्शक डॉ. शशिकांत डोईफोडे उपस्थित होते. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 11 वाजता प्रख्यात सिनेनिर्माते गजेंद्र अहिरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला सिनेनिर्माते विजय कोंडके, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार, एनएफएआयचे संचालक प्रकाश मकदूम, राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे राज्याचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, राजेश तुपकर, मिहिर जोशी उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांनाही मिळणार माहिती
हेमंत जाधव म्हणाले, उद्घाटन सोहळ्याला 16 एम.एम.चे ज्येष्ठ वितरक सुरेश एकबोटे, आण्णा देशपांडे, सतिश विसाळ, राहुल सगरे, संजीव भंडार, सज्जन लोहार यांचा सन्मान होणार आहे. तर, ऑस्कर अॅवॉर्ड परिक्षण समितीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. महोत्सवात तू सुखकर्ता, आई, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, चोरावर मोर, तांबव्याचा विष्णू बाळ आदी चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. तसेच काही शाळांमधील विद्यार्थ्यांना संग्रहालयातील जुन्या चित्रपटांच्या रिळ व यंत्रसामग्रीची माहितीही देण्यात येणार आहे.
समारोपात कलाकारांचा सत्कार
डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, महोत्सवाचा समारोप रविवार, दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता पालकमंत्री गिरीष बापट, आशिष कुलकर्णी, माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोपप्रसंगी ज्येष्ठ कलाकार लीला गांधी, सुषमा शिरोमणी, विजय कोंडके, भालचंद्र कुलकर्णी, आशा काळे, ऐश्वर्या उर्फ सुरेखा राणे, गजेंद्र अहिरे, जयमाला इनामदार, यशवंत पारशेट्टी यांचा विशेष सन्मान होेणार आहे. महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून मोफत प्रवेशिका कार्यक्रमस्थळी शुक्रवार, दिनांक 19 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहेत. तरी पुणेकरांनी महोत्सवात मोठया संख्येने सहभागी होत चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवावा, असे आवाहनही त्यांनी केले.