पुणेकरांनी अनुभवला कथक नृत्यातील विविध रचनांचा आविष्कार

0

पुणे । रुपक, मत्त, रुद्र, रास या चार तालांची गुंफण असलेली तालमाला, फर्माईशी चक्रधार, कमाली चक्रधार अशा कथक नृत्यातील विविध रचनांचा अप्रतिम आविष्कार पुणेकरांनी अनुभवला. ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनिषा साठे आणि त्यांच्या शिष्या तेजस्विनी साठे यांनी रसिकांवर कथक नृत्याची मोहिनी घातली. मनिषा नृत्यालयाच्या 44 व्या वर्धापनदिनानिमित्त नृत्यसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी पं. मनिषा साठे आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्यरचनांचे सादरीकरण केले. कवी जयंत भिडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाषचंद्र डांगे, रवींद्र दुर्वे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नृत्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
जयदेवी जयदेवी जय अवनी माते… ही पर्यावरणाविषयीची आरती, उपकाराची फेड माणसा अपकाराने करु नको… हा पर्यावरणाचा पोवाडा आणि स्वर्ग उतरुनी धरणीवर येऊ दे… हा पर्यावरणाचा जोगवा अशा पर्यावरण संवर्धनाविषयी विद्यार्थीनींनी सादर केलेल्या नृत्यप्रकाराने रसिकांची मने जिंकली. शिवस्तवन, यती, धृपद, सरगम अशा कथक नृत्यरचनांच्या सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. बुंदन बुंदन बरसे मेघा… आणि नटनागरकी हे सारी लीला… या नृत्यप्रकारांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मिरर या नृत्यप्रकाराला रसिकांनी भरभरून दाद दिली. चारुदत्त फडके (तबला), देवेंद्र देशपांडे (हार्मोनियम), निखील महामुनी (सिंथेसायझर), मृण्मयी सिकनिस (सहगायन), वल्लरी आपटे (पढंत) यांनी साथसंगत केली.

आकर्षक नृत्यरचनांना रसिकांनी दाद
कार्यक्रमाची सुरुवात जय जय जगजननी देवी…. या देवीच्या स्तवनाने झाली. यानंतर गतनिकास, गिनती, चक्री अशा कथक नृत्यरचनांच्या सादरीकरणाद्वारे पं. मनिषा साठे आणि तेजस्विनी साठे यांनी नृत्यातील बारकावे रसिकांसमोर उलगडले. गोकुल की पनिहारी… या शुभा मुग्दल यांनी गायलेल्या बंदिशीवर सादर केलेल्या नृत्यप्रकाराला आणि रंगीबेरंगी फुलकारी छत्र्यांचा वापर करून सादर केलेल्या आकर्षक नृत्यरचनांना रसिकांनी दाद दिली.पूनम गांधी, वल्लरी आपटे, मधुरा आफळे, किर्ती गोस्वामी, पूजा मेहता, मयुरी राजवाडे-भिडे, रुचिता कल्याणी, मौशमी जाजू या विद्यार्थीनींनी नृत्य सादरीकरणासह कार्यक्रमाचे संयोजन केले.