पुणे । गोविंदा रे गोपाळा… अशा दहीहंडीच्या गाण्यांवर ठेका धरत पुणेकरांनी मंगळवारी मानवी मनोर्यांचा थरार अनुभवत मंगळवारी पुणे शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली.
शहरातील गोकुळभक्तांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळ आणि सुवर्णयूग तरुण मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी उपनगरासह मध्यवर्ती भागातील जनसमुदाय उसळला होता. सुवर्णयूग तरुण मंडळाची दहीहंडी भगवा ग्रुप, सोमवार व मंगळवार पेठ या पथकाच्या गोविंदांनी सहा थर रचून रात्री 9.00 वाजता फोडली. त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळाची दहीहंडी शिवतेज गोविंदा पथकाने सहा थर रचून रात्री 9.35 वाजता फोडली. यावेळी गोविंदांना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून रोपची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक दहीहंडी मंडळांनी उत्सवादरम्यान लाऊडस्पिकरसह ढोलताशा पथकांचे वादनही ठेवले होते. वादनातील विविध ताल आणि ठेक्यांवर तरुणाई ताल धरला होता.
शहराबाहेरील गोविंदा पथकांची हजेरी
कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, धायरी, हडपसर, कात्रज, बाणेर, औंध, शिवाजीनगर, चंदननगर, वडगाव शेरी या उपनगरांमधील मंडळांनी मोठ्या प्रमाणात डीजे लावले होते. मंडळाच्या ठिकाणी बेधुंद नाचणार्या तरुणाईवर डोळे दिपवून टाकणारी विविधरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दहिहंडी फोडण्यासाठी इंदापूर, भोर, बारामती, दौंड, मुंबई व अन्य ठिकाणांहून गोविंदा पथके आली होती. तसेच मावळ भागातून ढोल-ताशा आणि खेळांची पथकेही शहरात दाखल झाली होती. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांमधील तारे-तारकांना आमंत्रित करण्यात आले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
उत्सवादरम्यान दहिहंडी पाहण्यास येणार्या गोविंदाभक्तांना, दहिहंडी फोडणार्या गोविंदांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत चालावी यासाठी पुणे पोलिसांतर्फे जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची फौजही मोठ्या प्रमाणात कार्यरत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून संशयित व्यक्ती आणि वस्तूंची तपासणी करण्यात येत होती.
न्यायालयाच्या आदेशाचे सरसकट उल्लंघन
दहीहंडीच्या उंचीसंदर्भातील निर्बंध न्यायालयाने उठविल्यानंतर सर्वच दहीहंडी मंडळांनी आणि गोविंदा पथकांनी आनंद व्यक्त केला होता. या निर्बंधाशिवाय ध्वनिप्रदूषण, वरच्या थरावरील गोविंदाचे वय यासंदर्भात न्यायालयाने घालून दिलेल्या विविध आदेशांचे बहुतांश दहीहंडी उत्सव मंडळांनी उल्लंघन केल्याचे दिसून आले. काही मंडळांचा अपवाद वगळता अनेक मंडळांनी न्यायालयाच्या नियमांप्रमाणे दहीहंडीजवळ रुग्णवाहिका व इतर सोयी-सुविधा उपलब्ध केल्या नव्हत्या. अनेक मंडळांनी दणदणाट करणारे डीजे आणि ध्वनीवर्धकांच्या भिंती उभारल्या होत्या. अनेक ठिकाणी सेलिब्रिटींच्या आगमनानंतर दहीहंडी मंडळांनी फटाक्यांची आतषबाजी करत ध्वनी आणि वायू प्रदूषणात भरच घातली.
वाहतूक कोंडी
शहर आणि उपनगरातील मुख्य चौकांमध्ये आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दहीहंडी बांधून उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे सायंकाळनंतर शहराच्या बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दहीहंडी पहायला आलेल्या नागरिकांनी रस्त्याच्या बाजुलाच आपली वाहने लावल्याने या वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत गेली.