पुणे । टेमघर धरणाच्या दुरुस्तीला आणखी एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. यंदाच्या पावसाळ्यातही या धरणात 100 टक्के पाणी साठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे टेमघर धरणात 1.75 टीएमसी पाणीसाठा कमी असणार आहे. त्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचनासाठी, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी अत्यंत काटेकोरपणे पाणीवापर करणे आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होवूनही पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचा प्रकार गेल्या वर्षी उघडकीस आला होता. त्यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या धरणाची पाहणी केली होती. तातडीने धरणाची दुरुस्ती करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली असली तरी हे काम पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले. टेमघर धरणाची एकूण क्षमता 3.71 टीएमसी आहे. तर सध्या धरणात फक्त 2.05 टीएमसी म्हणजे 55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने शासनाने स्थापित केलेल्या तज्ञ समितीने 695मीटर पातळीपर्यंत पाणीसाठा धरणामध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे टेमघर धरणात 1.15 टीएमसी पाणीसाठा कमी असणार आहे. त्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचनासाठी, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी अत्यंत काटेकोरपणे पाणीवापर करणे आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.
गळतीमुळे पाणी सोडावे लागणार
गळतीमुळे हे धरण 55 टक्के भरून देण्यात येत आहे. गेल्या वर्षी या धरणात एक टीएमसी पाणीसाठा कमी करून सोडण्यात आला होता. दुरुस्तीमुळे यंदाही या धरणात कमी साठा ठेवण्यात आला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्या धरणांपैकी हे एक धरण आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठाच्या दुप्पट पाणीसाठा या धरणात होतो. मात्र गळतीमुळे या धरणात पावसाळ्यात जमा होणारे पाणी खाली सोडावे लागते. दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे या या वर्षीच्या पावसाळ्यात या धरणात पुरेसा पाणीसाठा करता येणार नाही. यंदा जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला. सर्वच धरणे 100 टक्के भरली आहेत. वरच्या भागातील धरणे 100 टक्के भरल्याने मोठ्या धरणांपैकी एक असलेले उजनी धरणही 100 टक्के भरले आहे. मात्र दुरुस्तीचे काम सुरू असल्याने टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. पर्यायाने पुणेकरांना यंदा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.