पुणेकर खवैय्यांना ‘भारी भरारी’ची मेजवानी

0

पुणे । मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, कर्‍हाडे ब्राह्मण बेनेवालेंट फाउंडेशन आणि युवा यांच्या वतीने आयोजित ‘भारी भरारी’ची पुणेकर खवैय्यांना मेजवानी दि. 5, 6 व 7 जानेवारीला मिळणार आहे. शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल येथे या ‘फन फूड शॉपिंग फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी सकाळी 11 वाजता चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी यांनी दिली.

जोशी म्हणाले, या फन फूड शॉपिंग फेस्टिवलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून चवदार अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गृहसजावट वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. लहान मुलांसाठी असंख्य खेळ, तर गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू देखील असणार आहे. नवीन वर्षातील या खाद्य यात्रेबरोबरच ग्राहकांना धम्माल गेम्स आणि शॉपिंगचा देखील मनसोक्त आनंद ग्राहकांना घेता येईल. या फेस्टिवल मध्ये लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन होईल.