पुणेकर रसिकांना सवाई गंधर्व महोत्सवाचे वेध

0

पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणजे शास्त्रीय संगीताचा स्वरयज्ञच. पुणेकर रसिकच नव्हे तर अनेक ठिकाणाहून संगीतप्रेमी या महोत्सवाला आवर्जुन उपस्थित राहतात. याच महोत्सवातील षड्ज आणि अंतरंग हे कार्यक्रम येत्या बुधवारी 13 डिसेंबर ते शुक्रवार 15 डिसेंबर रोजी पुण्यात होणार आहेत. पुण्याच्या गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटर जवळील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेत हे कार्यक्रम होणार असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. षड्ज कार्यक्रमाअंतर्गत रसिकांना विविध चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

सवाई गंधर्व महोत्सवातील आणखी एक आकर्षण म्हणजे छायाचित्र प्रदर्शन होय. या प्रदर्शनाला दहा वर्षे पूर्ण झाली असून यामध्ये तंतुवाद्य वादकांची छायाचित्रे रसिकांना पाहाता येतील. ग्लोरी ऑफ स्ट्रींग्ज असे यावर्षीच्या या छायाचित्र प्रदर्शनाचे नाव आहे. छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी गेल्या 33 वर्षात वेगवेगळ्या मैफिलीत टिपलेल्या कलावंतांपैकी निवडक अशा 70 वादकांचे सादरीकरण करतानाचे भाव या छायाचित्र प्रदर्शनात रसिकांना पाहायला मिळणार आहेत. भारतात तंतूवाद्यांची मोहिनी घालणारे अनेक बुजुर्ग कलाकार होऊन गेले व आजही आहेत. हे कलाकार रसिकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने यावर्षी या संकल्पानेअंतर्गत हे कृष्णधवल छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

दिवस पहिला- बुधवार 13 डिसेंबर, 2017
षड्ज अंतर्गत भास्कर राव दिग्दर्शित म्युझिक ऑफ इंडिया (इंस्ट्रुमेंटल) हा लघुपट. प्रमोद पाटी दिग्दर्शित रवी शंकर माहितीपट. एस. बी. नायमपल्ली दिग्दर्शित पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्यावरील लघुपट दाखविण्यात येणार आहे. अंतरंगमध्ये प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची मुलाखत.

दिवस दुसरा – गुरुवार दि. 14 डिसेंबर
षड्ज अंतर्गत दुसर्‍या दिवशी प्रजना परिमिता पराशेर दिग्दर्शित पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील माहितीपट. अंतरंगमध्ये ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांची मुलाखत.

दिवस तिसरा – शुक्रवार दि. 15 डिसेंबर
तिसर्‍या दिवशीच्या षड्जमध्ये रजत कपूर दिग्दर्शित तराना लघुपट. पी. के. साहा दिग्दर्शित सारंगी – द लॉस्ट कॉर्ड लघुपट. अंतरंगमध्ये प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर – टिकेकर, महेश काळे आणि श्रीनिवास जोशी यांचा स्वरसंवाद.

वत्सलाबाई जोशी पुरस्कार
वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. 51 हजार रुपये रोख, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पं. नाना मुळे यांनी अनेक वर्षे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना तबल्याची संगत केली आहे.