पुण्यातील नारायण पेठेमधील पत्र्या मारुतीचा जवळचा चहा
अमृततुल्य चहा तर सर्वांनीच पिला असेल पण चक्क पुण्यातलं अमृत पिलय का असं कुणी विचारलं तर मी छाती ठोकून सांगेन(५६ इंच नसली तरी) “जी हा मित्रों”.स्पर्धा परीक्षा तत्सम लढाईमधील एक तरी जिंकायचीच या निश्चयाने नियती शी झुंज देणारे संघर्षयोद्धे, आगामी प्रेमाच्या दुनियेत डोळ्यांनी योगासने(रामदेव बाबा ची नाही) करण्यासाठी आलेले प्रेमवीर व खऱ्याखुऱ्या प्रेमाच्या दुनियेतले रहिवासी, पाय मोकळे करतो असं सांगून मन मोकळं करायला बाहेर पडलेले तमाम आजी आजोबा आणि समर्थांच्या ठेविलें अनंते तैसेचि राहावे उक्तीचे तंतोतंत पालन करणारे वाडावासी या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे “पत्र्या मारुती चा चहा”
पदवीच्या काळातील परीक्षेचा राक्षस,नंतर बेरोजगारी वर त्यावर मात करून नोकरी चा ब्रम्हराक्षस या समस्त राक्षसकुळाशी युद्ध करताना मनाला मरगळीची मूर्च्छितावस्था आल्यावर ‘पत्र्या मारुती’च संजीवनी आणून देतो अशावेळी रामायण आठवून (कभी कभी आपुन ही लक्ष्मण है) असा गैरसमज झाल्याशिवाय राहत नाही, रामायणाचा उल्लेख आलाच आहे तर कुंभकर्ण यांचे वंशज असलेले काही वाडावासी ना झोपेतून जागं करण्यासाठी घंटा म्हणूनही पत्र्या मारुती चा चहा उपयोगी पडतोच.(याचं नाव काढलं की लोक झोपेतून जागे होतातच) पत्र्या मारुतीचा चहा आणि आमचं नातं किती अतूट आहे याचं उदाहरण म्हणजे पदवी नंतरच्या संघर्ष काळात आम्हाला भेटण्यासाठी काही हितचिंतक यायचे तेव्हा आम्ही वाड्यावर नसताना थेट पत्र्या मारुती ला येत असतते ही फोन न करता. हा चहा पिण्याची विशिष्ट वेळ नाही अथवा किती वेळा प्यावा याला मर्यादा ही नाही.
हे देखील वाचा
या “चाय पे चर्चे” मध्ये गावाच्या गल्लीपासून देश विदेशातल्या घडामोडी आणि चावडीच्या भांडणा पासून ते सरकारच्या धोरणापर्यंत चर्चा तावातावाने केल्या जातात,अशा या अशा या पत्र्या मारुतीच्या अमृत प्राशनाने दिवसाची सुरुवात आणि शेवट होतोच,याची स्पर्धा करण्यासाठी बरेचसे अमृततुल्य आहेत.पण ज्याप्रमाणे सामान्य वानराने कितीही उडया मारल्या तरी त्याचा हनुमंत होत नाही तसेच कितीही अमृततुल्य बनली त्याचे अमृत होत नाही.
असो तर हे चहा पुराण लिहीत असताना मला दोन वेळा हाक ऐकायला आली त्यातली एक तरी चहासाठी असली पाहिजे हे वेगळं सांगायला नको!!तर माझं चहा पुराण थांबवतो आणि आम्हा वाडावासी च्या भाषेत “चहा मारून येतो.”
विवेक कौसडीकर,पुणे