पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व परवानग्या सहा महिन्याच्या आत घेणार

0

मुंबई : पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या येत्या सहा महिन्यांच्या आत घेऊन लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. या विमानतळासाठी पुणे जिल्ह्यात पुरंदर इथं अठराशे हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सुमारे दीड लाख रोजगार उपलब्ध होणार असून विस्थापितांना योग्य मोबदला दिला जाईल अशी माहिती राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानपरिषदेत दिली.

पुणे जिल्ह्यात पुरंदर येथे अठराशे हेक्टर जागेवर विमानतळ उभारण्याचा निर्णय घेऊनही पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची लक्षवेधी शरद रणपिसे, अनंत गाडगीळ आदींनी विचारली होता. या लक्षवेधीला उत्तर देताना येरावार म्हणाले की २०१४-०१५ च्या तुलनेत २०१५-१६ मध्ये विमानप्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांच्या संख्येत २९ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये भविष्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या निरीक्षणातून व्यक्त केले. तसेच प्राधिकरण आणि राज्य शासनाने गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण (मुंजेवाडी), पारगांव मेमाणे ( भोसलेवाडी), राजेवाडी, ताम्हणेवाडी, नायगाव ( राजूरी – रिसेपिसे) कोलविरे नव्हाळी या सहा ठिकाणी पाहणी केली होती. त्यापैकी मुंजेवाडी – पारगांव मेमाणे ( साईट 1 ए) ता. पुरंदर या गावातील एका ठिकाण विमानतळ विकासासाठी योग्य असल्याचे प्राथमिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणचे भू संपादन, वीज मार्ग आणि रस्तेबदल करण्याबाबत प्राथमिक स्तरावर माहिती देण्यात आली आहे. तसेच याठिकाणी विमानतळ विकसित करायचे झाल्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत याबाबतचा तांञिक – आर्थिक व पर्यावरणात्मक अहवाल केंद्र सरकारला सादर करावा असेही प्राधिकरणाने कळवल्याचे येरावार यांनी सांगितले. त्यानुसार विमानतळाचा ‘ ऑब्सटॅक्ल लिमिटेशन सर्वे ‘ अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आणि तांञिक – आर्थिक व पर्यावरणात्मक अहवालासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली तांञिक सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, मिहान इंडिया लि., महाराष्ट्र विमानतळ विकास आणि सिडकोच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती या चर्चेवेळी देण्यात आली.