पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रांगणात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा!

0

पुणे । द्वी-दशकपूर्ती साजर्‍या करणार्‍या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभा राहणार आहे. या कामाचे भूमीपूजन व कामाचा प्रारंभ गुरुवारी मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाचा खर्च मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँक करीत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, दिलीप गिरमकर, विनोद मथुरावाला, प्रियांका श्रीगीरी, बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड, लतिफ मगदूम, वाहिद बियाबानी, केजार पूनावाला, हैदर पूनावाला, महेंद्र कांबळे, रुपाली बीडकर याप्रसंगी उपस्थित होते.

…म्हणून अभिवादन मिरवणूक
पाच लुंबिनी विहार उभारायला देखील आम्ही मदत केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महंमद पैगंबर यांच्या विचारांच्या प्रसारासाठी आम्ही 17 वर्षांपासून अभिवादन मिरवणुका काढत आहोत. सर्वसमावेशकतेचा संदेश यातून दिला जाणार आहे, असे डॉ. इनामदार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

19 फेब्रुवारील उद्घाटन
शिल्पकार महेंद्र थोपटे, आझम कॅम्पस कला महाविद्यालयाच्या हेमा जैन आणि कपिल अलास्कर, आर्किटेक्ट महाविद्यालयाचे रिबेरो रोमेइरो सिल्व्हेरिया, जोहर सियामवाला यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 19 फेबुवारी 2018 रोजी शिवजयंतीच्या दिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवाजी महाराज विचारांचे प्रतीक
’शिवाजी महाराज हे जाती, धर्माचे प्रतीक नसून, विचारांचे प्रतीक आहेत. महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजेत’, असे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले. राष्ट्रपुरुष नेहेमी सर्वसमावेशक असतात, शिवाजी महाराज हे लोकोत्तर व्यक्तिमत्व आहे. त्यांचा पुतळा कँटोन्मेंट बोर्डात होत आहे. बोर्डाच्या द्वी-दशकपूर्ती निमित्त ही अतिशय समयोचित बाब आहे. त्याला मुस्लिम बँकेचा हातभार लागत आहे, यात कर्तव्यपूर्तीचा आनंद आहे, असे प्रतिपादन डॉ. पी. ए. इनामदार यांनी यावेळी केले.