पुणे, चिखलीत स्वाईनचे दोन बळी

0

पुणे : राज्यभरात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढू लागली असून, स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रूग्णांमध्ये पुण्यातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गुरूवारी पुण्यातील 60 वर्षीय महिलेचा, तर चिखलीतील एका चिमुकल्याचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यात स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 19 वर गेली असून, राज्य सरकारने स्वाईन फ्लूबाबत पुण्यात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

राज्यात स्वाईन फ्लूचे 222 रुग्ण आढळले असून, 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यभरात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूपैकी 35 टक्के रुग्ण पुणे शहर आणि ग्रामीण भागातील आहेत. शहरात जानेवारीपासून 109 रुग्णांची नोंद झाली असून, 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांपैकी 7 रूग्ण हे पिंपरी- चिंचवड हद्दीतील आहेत. 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, सध्या 28 रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तसेच, गंभीर असलेल्या 11 रुग्णांना कृत्रिम श्‍वासोच्छावासावर ठेवण्यात आले आहे.

संसर्गाचा वाढता धोका
पुण्यात स्वाईन फ्लूच्या विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे शहरात स्वाईन फ्लूच्या रूग्णांत वाढ होत आहे. गुरुवारी शहरात 60 वर्षीय महिलेचा या आजाराने मृत्यू झाला. या महिलेची 19 मार्चला खासगी रूग्णालयात तपासणी करण्यात आली. 20 मार्चला स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला.

चिखलीतील चिमुकल्याचा मृत्यू
स्वाईन फ्लूची साथ आटोक्यात येण्याऐवजी अजून वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चिखली येथील एका वर्षाच्या मुलाचा स्वाईन फ्लूने बुधवारी रात्री मृत्यू झाला. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 20 मार्चला या मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. पिंपरी- चिंचवड परिसरातील स्वाईन फ्लूचा हा सातवा बळी ठरला आहे. त्याचप्रमाणे 49 रुग्णांना स्वाईन फ्लू झाला असून, त्रापैकी 9 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

अधिक लशींचा प्रस्ताव
स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे व पिंपरी- चिंचवड पालिकेने विविध यंत्रणा राबविल्या आहेत. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे पालिकेने अधिक लशींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तसेच, पालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या 1800 लशींपैकी 1400 लसी देण्यात आल्या आहेत. अधिक लशींसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, मेपर्यंत नवीन लस उपलब्ध होणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी जनशक्तिशी बोलताना दिली.