रावेर स्थानकानजीकची घटना : जबलपूरच्या महिलेचे 15 हजार लांबवले
रावेर- डाऊन 01655 पुणे-जबलपूर साप्ताहिक एक्स्प्रेसची चैन पुलिंग करीत झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील पर्स लांबवण्यात आल्याची घटना रावेर स्थानक सुटल्यानंतर बुधवारी पहाटे 2.41 वाजता घडली. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी खंडवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जबलपूर एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 3 च्या बर्थ क्रमांक 69 वरून प्रवास करणारी महिला प्रवासी अखत्यारी बेगम (जबलपूर) झोपल्या असल्याची संधी चोरट्यांनी साधली. गाडीने रावेर स्थानक सोडल्यानंतर अवघ्या एक किलोमीटर अंतरावर खांबा किलोमीटर 482/28 जवळ तीन चोरट्यांनी चैन पुलिंग केली तर महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर 25 ते 30 वयोगटातील तीन चोरटे पसार झाले. रात्री 2.41 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तब्बल 11 मिनिटे गाडी डिटेन झाली. प्रवाशांनी आरडा-ओरड केल्यानंतर रेल्वे गेटमन फारूक शेख खाटीक यांनी वाघोडा व रावेर स्टेशन अधीक्षकांसह नियंत्रण कक्षाला माहिती कळवली.
खंडव्यात गुन्हा दाखल : यंत्रणेची धावपळ
बर्हाणपूर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक भूपेंद्र सिन्हा व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर सुरक्षा बलाचे रावेरचे सहाय्यक निरीक्षक पारधे व सहकार्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, या गाडीला बर्हाणपूरला थांबा नसल्याने खंडवा येथे गाडी आल्यानंतर महिला प्रवाशाने तक्रार दिल्याचे समजते. या गाडीतील अन्य कुणा प्रवाशाला लुटण्यात आले वा नाही? याबाबत माहिती कळू शकली नाही. भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी व सहकार्यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी जावून पाहणी केली.