पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्मचारी वसाहत जमीनदोस्त

0

बारामती । बारामती शहराच्या एसटी बस डेपोच्यासमोर अवघ्या तीन मिनीटांच्या अंतरावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती तालुक्याची मुख्य शाखा आहे. या शाखेच्या पाठीमागेच अधिकारी व कर्मचार्‍यांची वसाहत होती. या वसाहतीत 33 अधिकारी व कर्मचार्‍यांची निवासस्थाने होती. ही इमारत जमीनदोस्त करून याठिकाणी तीन मजली इमारत उभी राहत आहे. काही वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत जमीनदोस्त केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 38 वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत निकृष्ट दर्जाची होती का, असा प्रश्‍न बँकेच्या सभासदांसमोर उभा राहिला आहे.

38 वर्षापूर्वी बारामती येथे ही इमारत उभी करण्यात आली. विशेष म्हणजे बँकेची मुख्य इमारात आजही सुस्थितीत उभी आहे. मात्र यानंतर दोन ते तीन वर्षांनी अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी बांधलेली वसाहत मात्र जमीनदोस्त केली गेली. याबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित राहत आहे. या इमारतीचे आयुष्यमान फक्त 38 वर्षाचेच होते का असा प्रश्‍न सभासदांमधून विचारला जात आहे. 1980 ला बांधलेली कर्मचारी वसाहत चुन्याच्या बांधकामात व दोन मजली स्वरूपात होती. या वसाहतीत 33 अधिकारी व कर्मचारी रहात होते. दोन वर्षापूर्वी या इमारतीतील स्लॅबच्याखाली सिमेंटचे काम निसटायला सुरुवात झाली व स्लॅब कोसळू लागले. यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले व येथील सर्व कर्मचार्‍यांनी ही इमारत सोडून बाहेर राहणे पसंत केले. त्यामुळे ही इमारत ओस पडली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. या ऑडीटचा अहवाल बँकेने स्विकारून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. व हाच अहवाल बारामती नगरपालिकेलाही सादर केला. यानंतर तीन मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. अवघ्या अडीच महिन्यापूर्वी अधिकारी कर्मचारी वसाहत बांधण्यास सुरूवात झाली. या नवीन इमारतीत तीन मजले असून बारा सदनिका या अधिकार्‍यांसाठी आहेत. बारा सदनिका या शिपायांसाठी आहेत. तर सोळा सदनिका या इतर कर्मचार्‍यांसाठी आहेत. 40 सदनिकांची ही इमारत उभी राहत असून त्याला एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

या बँकेची सदरची जागा ही स्मशानभूमीची असल्याचे सूत्रांकडून समजते. जमीन हस्तांतराची माहिती ही बँकेच्या मुख्य कार्यालयास उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मुख्य इमारत सुस्थितीत असताना कर्मचारी वसाहतीचे तत्कालीन ठेकेदाराने व बँकेने ही इमारत पाडण्याची घाई का केली असा प्रश्‍न उपस्थित होतो.