हडपसर । महाराष्ट्रात बेकारी आहे हे अर्धसत्य आहे; कारण परप्रांतातून येणार्यांना महाराष्ट्रात सहज रोजगार मिळत आहे. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कष्ट, सचोटी, चिकाटी व प्रामाणिकपणा यांची गरज असते. पुस्तक वाचून यशस्वी व्यावसायिक होता येईलच; असे नाही त्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो, असे मत उद्योजक सुरेश कोते यांनी व्यक्त केले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापनदिन अण्णासाहेब मगर महाविद्यालयात नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक बाबूराव घोलप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाने उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन केले. याचे उद्घाटन कोते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्रीकांत सिकची, विनोद रावळ, प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप, एम. एन. कदम आदी उपस्थित होते.
या निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीत कोते म्हणाले, व्यवसायात यश मिळाले तरी स्पर्धेबरोबर सातत्याने बदलही अपेक्षित असतात. नफ्या-तोट्याच्या पडताळणी बरोबरच हिशोबातील पारदर्शकताही महत्त्वाची असते. गुणवत्ताच ग्राहक टिकवून ठेवते तर अतिरेकी नफेखोरी गुणवत्तेला मारक ठरते. डॉ. शुभांगी औटी यांनी मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.एस. मोहोळ यांनी तर आभार प्रा.एस.डी. कामठे यांनी मानले.