पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचा आमदार भाजपाच्या वाटेवर

0
राज्यातील काँग्रेसचे इतर 14 आमदारही कुंपणावर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचाही समावेश
पिंपरी-चिंचवड : बापू जगदाळे
सध्या राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण असले, तरी विरोधातील काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यासाठी भाजपने देखील ठराविक काही लोकांची टीम या कामासाठी जुंपली आहे. यात या टीमला यशही येत आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्हयातील कॉग्रेस ग्रामीण भागातील एकमेव आमदार भाजपाच्या गळाला लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर या आमदाराचा भाजप प्रवेश होणार आहे. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या एका पदाधिकार्‍याने नकळतपणे खाजगीत बोलताना सांगितले. यामुळे तो आमदार कोण? याबाबत उलट-सुलट चर्चा पूर्ण जिल्ह्यात सुरु आहे.
या आमदाराचे वडील व माजी मंत्री राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणुन सबंध  जिल्ह्यात व राज्यात ओळखले जातात. सध्या राज्यात व देशात कॉग्रेसला उभारी देईल असे एकही नेतृत्व नसल्यामुळे आपल्या स्वत:च्या ताकदीवर राजकारणात तग धरुन राहिलेले अनेक कॉग्रेस नेते भाजपात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहेत. तसेच केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यात देखील स्वबळावर भाजप लढला तरी बहुमत मिळवू शकतो, असे कार्यकर्त्यांचा दावा आहे. यामध्ये अशा कॉग्रेस व राष्ट्रवादी मधून आलेल्या आमदारांची चांगलीच मदत होणार असल्याचेही या भाजपा नेत्याकडून सांगण्यात आले. या नेत्याकडे कोल्हापुर जिल्हयाच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. यावेळी  पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सध्या भाजपापुढे व विरोधात सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने अनेक विरोधी पक्षातील आमदार भाजप प्रवेशाचा मार्ग जवळ करत आहेत.