पुणे : देशातील 100 जुने पूल हे कधीही कोसळू शकतात अशा स्थितीत आहेत तर 147 पूल धोकादायक स्थितीत आहेत, अशी धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली होती. दरम्यान, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विशेष परीक्षणात पुणे जिल्ह्यातील सर्व पूल हे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ब्रिटीशकालिन 177 पुलांचाही समावेश आहे.
500 पूल वाहतुकीसाठी सुरक्षित
जिल्ह्यातील सर्व पूल वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी वापरण्यास सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांवरील छोट्या 6698 मोर्यांचीही तपासणी या विशेष मोहिमेंतर्गत करण्यात आली होती. यावेळी दुरूस्तीसाठीच्या योग्य त्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. तसेच एकूण 500 पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केले आहे.
महाड दुर्घटनेनंतर विशेष सुरक्षा परिक्षण
रायगड जिल्ह्यातील महाड येथे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबई-गोवा महार्गावर सावित्री नदीवरील ब्रिटीशकालिन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये 41 जणांचा जीव गमवावे लागले होते. यानंतर राज्यातील सर्व पुलांचे विशेष मोहिमेंतर्गत सुरक्षा परीक्षण करण्यात आले.
राज्यात 19000 पूल
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पुणे जिल्ह्यातील सर्व पुलांच्या बांधकामांची तज्ज्ञांच्या विशेष पथकाने तपासणी केली आहे. यावेळी आढळलेल्या काही त्रुटींची तातडीने दखल घेऊन दुरूस्तीदेखील करण्यात आली आहे. महाड येथील सावित्री पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व पुलांचे सुरक्षा परीक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील 19000 पुलांचे सुरक्षा परीक्षण सुरू आहे. राज्यभरात 17058 छोटे तर 2515 मोठे पूल आहेत.
जिल्ह्यातील 518 पुलांचे सुरक्षा परीक्षण
पुणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण 518 पुलांचे सुरक्षा परीक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये 429 छोटे तर 89 मोठे पूल आहेत. यापैकी 39 मोठे तर 138 लहान पूल हे ब्रिटीशकालिन आहेत. या ब्रिटीशकालिन पुलाचे सुरक्षा परीक्षण करताना विशेष काळजी काळजी घेतली आहे. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचा विचार करून पुणे जिल्ह्यातील पुलांचे सुरक्षा परीक्षण अगोदरच पूर्ण करण्यात आले आहे.