विकासासाठी 16,430 कोटी
पुणे | पुणे जिल्ह्यात तेरा ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध कामांसाठी 16 हजार 430 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. विविध रस्त्यांच्या कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
खंबाटकी घाटासाठी 1000 कोटी
पुणे-सातारा रस्त्यावरील खंबाटकी घाटासाठी 1000 कोटी रुपये खर्चून नवीन बोगदा बांधण्याची घोषणा देखिल गडकरी यांनी यावेळी केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार्या पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग -4 (नवीन राष्ट्रीय महामार्ग-48) वरील चांदणी चौक, पूल आणि निगडीत कामे तसेच सौंदयीकरण आणि पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-50 (नवीन राष्ट्रीय महामार्ग-60) च्या खेड सिन्नर विभागातील पाच बायपास मार्गांचा कोनशीला अनावरण समारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला.
महामार्गांचे सहापदरीकरण
खेड सिन्नर राष्ट्रीय महामार्ग-50 (नवीन राष्ट्रीय महामार्ग-60) चे चौपदरीकरण आणि पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग-4 (नवीन राष्ट्रीय महामार्ग-48) चे सहापदरीकरणाचा लोकार्पण सोहळादेखिल पार पडला. खासदार शरद पवार, अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
हि होणार कामे
16430 कोटी रुपयांच्या पॅकेजमधून आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे विस्तारीकरण, संत तुकाराम पालखी मार्ग, वासुंदे बारामती ते फलटण, पुणे नाशिक महामार्ग, भोर शिरवळ लोणंद वाठार सातारा मार्ग, तळेगाव जंक्शन, चाकण शिक्रापूर, न्हावरा चौफुला चौक यांना जोडणारा महामार्ग, धार्मिक पर्यटनस्थळांना जोडणारा सरळगाव भीमाशंकर वाडा-खेड आदी रस्त्यांचा समावेश आहे.