पुणे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा फैलाव; डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू

0

पुणे । जिल्ह्यात 13 तालुक्यातील विविध 16 ठिकाणी डेंग्यूचे प्रमाण वाढले असून 120 जणांना त्याची लागण झाली आहे. तर 9 जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. तसेच चिकुनगुनियाचा 5 ठिकाणी प्रादुर्भाव वाढला असून 81 जणांना त्याची लागण झाली आहे. साथीच्या आजार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. ताप, हिवताप, चिकुनगुनिया, काला आजार, जे. ई सारख्या आजारांचा फैलाव वाढला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान डेेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. साथीच्या रोगांवर नियत्रंण आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. तर धुराळणी, संशयित रूग्णांची तपासणी करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

त्वरित रक्त तपासणी
दरम्यान 13 तालुक्यातील विविध गावामध्ये थंडी-ताप, सर्दी-खोकल्याचे अनेक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल होत आहेत. विशेषतः डेग्यू, चिकुनगुनिया, जे. ई. आजारामुळे नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. काही तालुक्यात जे. ई. रोगाचा फैलाव झाला आहे. एकूण दोन ठिकाणी या रोेगाचा उद्रेक झाला असून, दोन जणांना लागण झाली आहे. तर 43 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. डेंग्यू नियंत्रण आणण्यासाठी रोगाची लक्षणे आढळणार्‍या नागरिकांची रक्त तपासणी करण्यात येत आहे.

48 जणांना डेंग्यूची लागण
जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 213 नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 48 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निर्दशनात आले होते. मागील काही महिन्यात चिकुनगुनियाची साथ वाढल्यामुळे 81 जणांना रोगाची लागण झाली होती. त्यामुळे संशयित 65 जणांचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आले हेाते. त्यापैकी 46 जणांना चिकुनगुनिया झाल्याचे आढळून आले आहे. पिण्याच्या पाण्यापासून होणारे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, काविळ, विषमज्वर आजाराची जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये एकही रूग्ण जिल्ह्यामध्ये आढळून आला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.

स्वच्छता राखणे गरजेचे
साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने काळजी घेतली जात आहे. थंडी-ताप अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजारापासून दूर राहण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धुराळणी, फवारणीस प्राधान्य द्यावे.
– डॉ. दिलीप माने,
जिल्हा आरोग्य अधिकारी