लोणावळा : लोणावळ्याजवळील विद्या प्रसारणी सभेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मूलभूत सोयीसुविधांबाबत संस्थेने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांना प्रस्तावामध्ये खोटी माहिती देऊन सन 2016-17 या वर्षात अभियांत्रिकीची मान्यता मिळवली. मात्र सदर महाविद्यालयातील कामकाजात अनियमितता आढळून येत असल्याने 2017-18 या वर्षात सदर संस्थेचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी विचार करु नये, अशी शिफारस व सोबत अनियमिततेबाबतचा अहवाल पुणे तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला नुकताच पाठविला आहे.
17 आरोपांपैकी 9 आरोपांमध्ये तथ्य
विद्याप्रसारणी सभा अभियांत्रिकी महाविद्यालयात मूलभूत सोयीसुविधा नाही, विद्यार्थ्याकडून जादा शुल्क आकारले जात आहे. शिक्षण शुल्क समिती प्रस्तावानुसार लायब्ररीमध्ये पुस्तके नाहीत, शिक्षक संख्या कमी असताना जास्त दाखवण्यात आली आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाची अहर्तादेखील कमी आहे, असा आरोप याच संस्थेत अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी केला होता. प्रहार विद्यार्थी संघटनेने देखील याबाबत आवाज उठवत संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने एक समिती गठीत करून महाविद्यालयात चौकशी व पाहणी केली असता प्रहार संघटनेने व विद्यार्थ्यांनी केलेल्या 17 आरोपांपैकी 9 आरोपांमध्ये तथ्य आढळले.
खोटी माहिती दिल्यामुळे महाविद्यालयाला फटका
परीक्षाकाळातील कॉपी प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यात संस्थेला अपयश आल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र दुसर्या महाविद्यालयात हालविण्यात आले आहे. संस्थेचे हे अपयश व तंत्र शिक्षण परिषदेला दिलेली खोटी माहिती यामुळे सदर संस्थेचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी विचार करु नये अशी शिफारस तंत्रशिक्षण विभागाने केली आहे.