‘पुणे तेथे काय उणे‘; लाचखोरीतही अव्वल!

0

पिंपरी-चिंचवड : लाचखोरीतही ‘पुणे तेथे काय उणे‘चा प्रत्यय आलेला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गेल्या चार महिन्यांत लावलेल्या सापळ्यांत पुण्यात सर्वाधिक लाचखोर अडकले असून, त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागतो. लाचखोरीत मुंबईऐवजी पुणे हिच राजधानी झाल्याची बाब चव्हाट्यावर आली आहे. पुणे विभागात एसीबीने एकूण 63 सापळे लावले होते. पैकी पुण्यात 24 सरकारी नोकरदार व अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर ठाणे 18 तर मुंबईत 11 लाचखोर जेरबंद करण्यात आल्याची माहिती एसीबीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

चार महिन्यात 232 लाचखोरांवर छापे
लाचखोरीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल होत असून, एकप्रकारे एसीबीच्या कामावर लोकांचा विश्‍वास वाढल्याचे ही बाब द्योतक आहे. लाचखोरीच्या घटना इतरत्र कमी झाल्या असल्या तरी पुण्यात मात्र त्या चांगल्याच वाढल्या असल्याचे एसीबीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कामकाजाकरिता आठ विभागात एसीबी विभाजित करण्यात आली आहे. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड या विभागांचा समावेश होतो. 1 जानेवारी ते 30 एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत एसीबीने एकूण 232 सापळे रचून छापे टाकले होते. त्यापैकी 63 छापे हे पुणे विभागात यशस्वी झालेत. या विभागात पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या शहरांच्या तुलनेत सर्वाधिक 24 लाचखोर हे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जाळ्यात अडकले आहेत. तर त्या खालोखाल ठाणे 18 व मुंबई 11 लाचखोर जाळ्यात अडकले आहेत. खातेनिहाय विचार करता, महसूल खात्यात सर्वाधिक लाचखोर सापडले असून, त्यानंतर पोलिस खात्याचा क्रमांक लागतो.

पुण्यात सर्वाधिक 22 लाचखोर महसूल खात्याचे!
पुणे विभागातील 63 पैकी 22 लाचखोर हे महसूल खात्यातील असून, तर पोलिस खात्याचे 11 लाचखोर आहेत. या लाचखोरांना अगदी रंगेहाथ पकडण्यात आलेले असल्याची माहितीही वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. या शिवाय, महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर विभागाचे बाबूदेखील लाच घेताना पकडले गेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे महसूल, जिल्हा परिषद, महापालिका किंवा नगरपालिका व भूनोंदणी अधिकारी यांच्याकडे सर्वाधिक काम पडत असते. त्यामुळे याच ठिकाणी सर्वाधिक लाचखोरीची प्रकरणे होत आहेत. लाचलुचपतीबाबत सर्वसामान्यांत जागृकता आणण्यासाठी लवकरच व्यापक मोहीमदेखील हाती घेतली जाणार असल्याचे या वरिष्ठाने सांगितले.

लाचखोरांची आकडेवारी (1 जानेवारी ते 30 एप्रिल)
* पुणे : 63
* नाशिक : 34
* ठाणे : 30
* औरंगाबाद : 27
* नागपूर : 25
* नांदेड : 23
* अमरावती : 22
* मुंबई : 11