पुणे – दक्षिण भारत थेट रेल्वे हवी

0

पुणे : रेल्वेची दक्षिण भारतावर अवकृपा कायम असल्याचे चित्र दिसते. उत्तर भारताला भरभरून देणार्‍या रेल्वेने दक्षिण भारताला मात्र कायमच दुय्यम वागणूक दिली आहे. मागणी असूनही पुण्याहून चेन्नई, बंगळुरूला एकही थेट रेल्वे नाही. सर्वच गाड्या मुंबईतून निघून व्हाया पुणे-चेन्नई किंवा बंगळुरूला जातात; मात्र त्या भरून येत असल्याने, तसेच आरक्षण मुंबईमध्येच संपत असल्याने पुण्यातून प्रवास करणार्‍यांची गैरसोय होते. पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आठवड्यातून दोनवेळा धावते, परंतु या गाडीला दररोज पाचशेच्यावर ‘वेटिंग लिस्ट’ असते. ही गाडी दररोज सोडावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच पुणे-चेन्नई, पुणे- बंगळुरू, पुणे-कोचीदरम्यान दररोज रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. दक्षिणेकडील अनेक जण पुण्यात राहतात, मात्र उत्तम कनेक्टिव्हिटी अभावी त्यांना त्यांच्या गावी जाण्यास अडचण होते. पुणेमार्गे जाणार्‍या गाड्यांवर त्यांना विसंबून राहवे लागते. पुण्यातून शंभर विशेष रेल्वे (हॉलिडे स्पेशल) गेल्या वर्षभरात सोडल्या गेल्या.

पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आठवड्यातून दोनवेळाच

त्यापैकी तब्बल 88 रेल्वे उत्तर भारतात धावल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. हटिया (रांची), गोरखपूर, मंडुआडीह, लखनौ (उत्तर प्रदेश), अजनी (नागपूर), हावडा, सांत्रागाछी (पश्‍चिम बंगाल), जबलपूर (मध्यप्रदेश), पाटणा (बिहार) येथे यांपैकी बहुतांश विशेष रेल्वे सोडल्या गेल्या. यातील अनेक गाड्या प्रवाशांची मागणी नसतानादेखील सुरू केल्याचे चित्र दिसते. उत्तरेत जाणार्‍या बहुतांश विशेष गाड्या निम्म्यादेखील भरत नसून, कुणाच्या सांगण्यावरून त्या सुरू करण्यात येतात, हा प्रश्‍न अनुत्तरित राहतो.