पुणे-नगर महामार्गावर भरतोय शिक्रापूरचा बाजार; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

0

शिक्रापूर । शिक्रापूर येथे गेल्या दहा दिवसांपासून किरकोळ भाजी विक्रेते पुणे-नगर रस्त्यालाच खेटून बसत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने शिक्रापूरचा आठवडे बाजार हा दर रविवारी नेमून दिला आहे. हा बाजार वेळ नदीतीरी भरतो. पण गेल्या दहा दिवसांपासून काही भाजीविक्रेते रोज दुपारी 4 वाजल्यापासून भाजीचे दुकाने पुणे-नगर महामार्गालगत लावून बिंनदास्तपणे बसत आहेत.

कारवाईची मागणी
या वाहतूक कोंडीत एखाद्या दुचाकी चालकाचा तोल गेल्यास जीवीतहानी होऊ शकते. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊनही स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येते. या महामार्गालगत भाजी विकण्यास बसणार्‍या विक्रेत्यांवर पोलिस व ग्रामपंचायतीकडून लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

वाहनांच्या रांगा
पुणे-नगर महामार्गावर 24 तास वर्दळ असते. सर्वात जास्त रहदारीचा व वाहतूक कोंडीचा मार्ग म्हणून तो प्रसिद्ध आहे. रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव व वाघोली या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. स्थानिक नागरिक त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करतात. तसेच प्रवासी रिक्षा वाहतूक करणार्‍या रिक्षाही महामार्गावरती पाबळ चौक व चाकण चौक येथे दिवसभर उभ्या असतात. यामुळेही वाहतूककोंडीत भर पडत असते. त्यातच या भाजी विक्रेत्यांमुळे पुणे-नगर महामार्गावरती शिक्रापूर येथे दुपारी 4 वाजल्यापासूनच वाहनाच्या रांगा लागत आल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

जीव धोक्यात
पुणे-नगर महामार्गावरून एखादे मोठे वाहन जात असेल तर या भाजीविक्रेत्यांना आपले दुकान थोडेसे आतमध्ये घेऊन त्या वाहनाला रस्ता करून द्यावा लागतो. अशा स्थितीतही विक्रेते तेथेच पुन्हा ठाण मांडून बसतात. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखिल हे विक्रेते जीव धोक्यात घालून भाजी विकताना दिसत आहेत.