पुणे-नगर रस्ता बनला वाहनतळ

0

शिक्रापूर । विविध कंपन्यांमध्ये माल पुरवणारी मोठी अवजड वाहने पुणे-नगर रस्त्यावर अवैधरित्या रस्त्यावरच उभी केली जात आहेत. रात्रीच्या वेळेस या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व कंपनीतील कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव तसेच रांजणगाव एमआयडीसी वसाहतीमध्ये परराज्यातील वाहने, मोठे कंटेनर पुणे-नगर रस्त्याच्या दोन्ही बाजूने रोज उभी केली जातात. मात्र यावर कोणीही कुठलीही कारवाई करत नाही. यामुळे अनेकदा ही वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे कामगार प्रवासी तसेच ग्रामस्थांना आपला जीव मुठीत धरून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी बेकायदेशीरपणे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या गाड्या आणि त्यासाठी आवश्यक असणार्‍या वाहनतळाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनी परिसरात आत जागा असतानाही कंटेनर तसेच मोठे ट्रक दोन तीन दिवस शिक्रापूर येथील चाकण रस्त्यावरच तसेच रांजणगाव येथे राजमुद्रा चौकाजवळ उभे असतात. जवळपास हे ट्रक निम्मा रस्ता व्यापत असल्याने या ठिकाणी वाहतुकीला रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.