वाघोली । पुणे-नगर रस्त्यावर कांचन हॉटेल शेजारी लावलेल्या चारचाकीची अज्ञात व्यक्तींकडून जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल मालक दिनेश गुप्ता यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे.
पुणे-नगर महामार्गालगत वाघोली गावच्या हद्दीमध्ये कांचन हॉटेल आहे. बुधवारी रात्री एकच्या सुमारास हॉटेल बंद करून मालक दिनेश गुप्ता घरी गेले होते. हॉटेल समोर असणार्या टपरीशेजारी त्यांनी जिप्सी लावली होती. अज्ञात व्यक्तीने कारवर पेट्रोल ओतून आग लावली व तो फरार झाला. नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दल, नियंत्रण कक्षास कळवून हॉटेल मालकांना कळविली. गुप्ता यांनी पाणी आणि आग प्रतिबंधक सिलिंडरद्वारे आग नियंत्रणात आणली. आगीची झळ टपरीला देखील लागली. यामुळे टपरीमध्ये ठेवलेला डेअरीचा माल व 17 सेट टॉप बॉक्स, बल्ब व इतर साहित्य जळून खाक झाले. लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपास करीत आहेत. आगीमध्ये जिप्सीची मागील बाजू पूर्णपणे जळून खाक झाले आहेत तर टपरीतील एक लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे. रविवारी (30 जुलै) याच कारची काच दगड मारून फोडल्याची घटना घडली होती.