पुणे । पुण्याहून विदर्भात जाण्यासाठी शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन स्लिपर ’शिवशाही’ बस सुरू करण्यात आल्या आहेत. विदर्भात स्लिपर बसने जाणार्यांना यापूर्वी खासगी वाहतूकदारांशिवाय पर्याय नव्हता. आता एसटीच्या दररोज फेर्या होणार असल्याने प्रवाशांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
एसटीकडून वातानुकूलित स्लिपर सेवा सुरू करण्यात आली आहे. पुण्यातून पहिल्या टप्प्यात नागपूर मार्गावर दोन बस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड येथून सायंकाळी साडेसहा वाजता एक बस सुटेल. ती शिवाजीनगर, नगर, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती मार्गे नागपूरला जात आहे. या बसला नागपूरचे तिकीट पिंपरी-चिंचवड येथून 1711 रुपये आणि शिवाजीनगर येथून 1683 रुपये आहे. दुसरी बस सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगरहून सुटेल. त्या बसला नागपूरसाठी 1672 रुपये तिकीट आहे. प्रवाशांना बसचे आगाऊ आरक्षण www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरून करता येईल. तसेच, एसटी महामंडळाने नव्याने तयार केलेल्या msrtc reservation app द्वारेही प्रवासी स्मार्ट फोनवरून आरक्षण करू शकतात.
या बसमध्ये मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग प्लग, उशी, ब्लँकेट या सुविधेसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा या सुविधा आहेत. पुणे-पणजी, पुणे-शहादा आणि निगडी-बेळगाव या मार्गांवर लवकरच स्लिपर सेवा सुरू होणार आहे. गोवा मार्गासाठी येत्या काही दिवसात बस सुरू होण्याची शक्यता आहे.
महामंडळाच्या ताफ्यात येणार दोन हजार ’शिवशाही’
एसटी महामंडळाच्या ताफ्यात दोन हजार शिवशाही बस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. सध्या 797 शिवशाही बस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत. प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवशाही बसपैकी 150 बस या 30 आसनी स्लिपर शिवशाही असून, त्या विशेष करून राज्यातील विविध शहरातून लांब पल्ल्याच्या अंतरासाठी चालविल्या जाणार आहेत, असे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले.