पुणे : राज्यात चैत्राच्या प्रारंभीच वैशाख वणवा पेटल्याने यंदाचा उन्हाळा आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. त्यातच राज्यभरातील जलाशयांमधील पाणीसाठी सध्याच 40 टक्क्यांवर आला आहे. विशेषतः पुणे आणि नागपूर विभागातील पाणीसाठा घटला असून, पुणे विभागात एप्रिलपासूनच टँकर सुरू करावे लागण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा लक्षणीयरित्या वाढला होता. यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे मानेल जात होते. पण पाण्याचा साठा आता कमी होऊ लागला आहे. त्यातच कडक उन्हाळा सुरू झाल्याने बाष्पीभवनामुळे पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे.
टँकर सुरू होण्याची चिन्हे
मुंबई, कोकण, मराठवाडा व नाशिक विभागात मार्चअखेरीसही पाणीसाठ्याची स्थिती बरी आहे. मात्र, पुणे विभागातील जलसाठा आत्ताच 37.36 टक्क्यांवर आला आहे. नागपूर व अमरावती विभागातील चित्रही काहीसे असेच आहे. नागपूर विभागातील जलसाठा 25.50 टक्क्यांवर, तर अमरातवती विभागातील टक्केवारी 39 वर आली आहे. त्यामुळे या विभागांत एप्रिलपासूनच अनेक ठिकाणी टँकर सुरू करावे लागण्याची चिन्हे आहेत.
धरण साखळीत 11 टीएमसी साठा
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाखलीत मार्चच्या अखेरीस अवघे 11 टीएमसी (सुमारे 39 टक्के) पाणीसाठा राहिला आहे. या धरणसाखळीतील वरसगाव धरणात 22.23, पानशेत धरणात 66.38 व खडकवासला धरणात 77.73 टक्के पाणीसाठा आहे. धरणांच्या परिसरात कडक उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. जोरदार पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्या सिंहगडाच्या परिसरात (घेरासिंहगड) पाण्याचे साठे आटू लागले असून, नजिकच्या काळात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागण्याची चिन्हे आहेत.