पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको

0

नारायणगाव । अहमदनगरेचे महापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या अपमानास्पद शब्दांचा राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, जुन्नर तालुका शिवसेना तसेच नारायणगाव शिवसेना शाखा यांच्यातर्फे पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बसस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी रास्ता रोको करत तीव्र निषेध करण्यात आला. छिंदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अन्यथा मंत्र्यांना शिवजयंती साजरी करू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. याबाबतचे निवेदन नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांना देण्यात आले आहे.

छिंदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा मंत्र्यांना शिवजयंती साजरी करू देणार नाही. आज शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत उद्या आई जिजाऊंच्या लेकी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आशा बुचके यांनी दिला. माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, योगेश (बाबु) पाटे, संतोष दांगट, आशिष माळवदकर यांनीही तीव्र शब्दात निषेध नोंदवला. रास्ता रोको दरम्यान शिवसैनिकांनी छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला.