सातत्याने होणार्या वाहतूककोंडीने वाहनचालक त्रस्त; आवश्यक तेथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी
चाकण । पुणे- नाशिक महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. महामार्गावर वाहतूककोंडी नित्याचीच समस्या झाली असून, या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राज्य मार्गदेखील धोकादायक झाला आहे. चाकण परिसरात औद्योगिकरण वाढले आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-शिक्रापूर राज्यमार्ग या दोन्ही मार्गांवरून वाहतूक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत आहे. वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता, संबंधित प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहन चालकांकडून होत आहे.
उड्डाणपूल नसल्याने कोंडी
महामार्ग व सर्व्हिस रस्त्यावर ठिकठिकाणी दुभाजकाचे दगड निघालेले आहेत. त्यातून अनेकदा दुचाकीचालक बाहेर निघतात किंवा बाहेरून आत येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते. तळेगाव चौक व आंबेठाण चौकादरम्यान कुठेही उड्डाणपूल नाही. त्यामुळे येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. चाकणकर या समस्येला पुरते त्रासले आहेत. महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने अनेकदा एसटी व पीएमपीएमएल बसचालक मुख्य मार्गावरून बस थेट सर्व्हिस रस्त्यावर आणतात. त्यामुळे कोंडीत भर पडते.
प्रकाशरोधक फलक तुटले
पुणे-नाशिक महामार्गासह तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राज्य महामार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा झाला आहे. चाकण-तळेगाव रस्त्यावर राणूबाईमळा ते सिग्नल चौकादरम्यान दोन्ही बाजूंनी रस्ता खचला आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवत प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पुणे-नाशिक महामार्गावरील मुख्य रस्ता दुभाजकावरील प्रकाशरोधक फलक (रिफ्लेक्टर) अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. महामार्ग व सर्व्हिस रस्त्यामधील दुभाजकाचे दगड अनेक ठिकाणी निखळून पडले आहेत.
सर्व्हिस रस्ताही धोकादायक
सर्व्हिस रस्ता चाकण शहरांतर्गतील वाहतुकीसाठी असल्याने नागरिक दोन्ही बाजूने त्याचा वापर करतात. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यावर नेहमी कोंडी होत असते. या कोंडीत अनेकदा रुग्णवाहिकादेखील अडकून पडतात. महामार्गावर होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. येथे सातत्याने अपघात होत असतात. अनेकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.