पुणे । पुणे-नाशिक मार्गावरील शिवनेरी पाठोपाठ हिरकणी सेवाही बंद करण्यात आली आहे. या मार्गावर नॉन एसी सेमी लक्झरी हिरकणीची थेट सेवा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र आता या सर्व फेर्या बंद करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील हिरकणी बस अन्य मार्गांवर वळविण्यात आल्याची माहिती एस. टी. प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
हिरकणी व शिवनेरीच्या जागी 13 वातानुकूलित शिवशाहीच्या बस दिवसभरात 38 फेर्या करणार आहेत. या गाडीचा तिकीट दर 346 रुपये आहे. हिरकणीच्या तिकिटापेक्षा शिवशाहीचे तिकीट अधिक आहे. हिरकणीचे तिकीट 308 रुपये होते. दरम्यान, ज्यांना आरामदायी पण विनावातानुकूलित प्रवास करायचा आहे, अशांसाठी हिरकणीचा पर्याय चांगला होता. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना बळजबरीने वातानुकूलित शिवशाहीने प्रवास करावा लागणार आहे. पुणे ते संगमनेर दरम्यान हिरकणीची सेवा मात्र सुरूच राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.