पुणे-नाशिक रेल्वेसाठी आंबेगाव तालुक्यात सर्व्हेक्षण

0

पुणे : पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी आंबेगाव तालुक्यात सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागातून रेल्वे जाणार असल्याने त्याचा फायदा सातगाव पठार, तसेच मंचर परिसराला होणार आहे. त्यामुळे रेल्वे चालू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुणे-नाशिक रेल्वेचा प्रकल्प मंजूर केला आहे. केंद्र व राज्य शासनाने याचा प्रत्येकी निम्मा खर्च उचलण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार निधी मंजूर झाल्याने आता पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.

दुष्काळी भागाला होणार लाभ
या मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम हायड्रोन्युम सिस्टिम्स रघुवंश पुणे या कंपनीला देण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागातील सातगाव पठारावरील कारेगाव, वाळुंजवाडी, घोडेगाव-मंचर ओलांडून वडगाव काशिंबेग, कळंबमार्गे नारायणगावला जाणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे कारेगाव, सातगाव पठारावरून जाणार असल्याने कायम दुष्काळी भाग असलेल्या पेठ, कारेगाव, कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी आदी गावांतील ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे.

असा असेल मार्ग
पुणे-नाशिक रेल्वे वडगाव, तळेगाव दाभाडे, चाकण, खेड, पेठ, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, नांदूर शिंगोटे, संगमनेर, सिन्नर, नाशिक रोड यामार्गे जाईल. हे अंतर 265 कि.मी. आहे.