पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडची भाजी पळाली!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी पुणे शहरासह पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्याच्या विविध भागात सामान्य नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. शहरी भागात आवक घटल्याने शहरवासीयांना भाजीपाल्यासाठी दुप्पट दर मोजावा लागत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना चांगलाच फटका बसला. अनेकांच्या तोंडची भाजी पळाली असून, भाजीपाल्यापेक्षा नुसता वरण-भात बरा असे म्हणायची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण या संपामुळे कोलमडले आहे. शेतकरी संपाचा किरकोळ व्यापार्‍यांनी पुरेपूर फायदा उठविल्याचे दिसून येत आहे. संपाचा बुधवारी शेवटचा दिवस असून, त्यानंतरही एक दोन दिवस संपाच्या झळा जाणवत राहण्याची शक्यता आहे. तसेच, संप पुढे चालू ठेवण्याबाबत सुकाणू समिती काय निर्णय घेते याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

व्यापार्‍यांनी हात धुवून घेतला!
संपामुळे मार्केटयार्डात भाजीपाल्याची आवक थंडावली होती. यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. मंगळवारी सरासरीच्या 70 ते 75 टक्के फळे व भाजीपाल्याची आवक झाली़ नेहमीच्या तुलनेत भाज्यांच्या दरांत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली होती. या संपाचा पुरेपूर गैरफायदा घेत किरकोळ व्यापारी मात्र ग्राहकांना भाजीपाला खूपच महाग दराने विकत होते. सोमवारी राज्यव्यापी बंदमुळे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात आवक मोठ्या प्रमाणात घटली होती़ सरासरीच्या अवघी पंचवीस ते तीस टक्के इतकीच भाजीपाल्याची आवक झाली होती़ बंदमुळे खरेदीदार, ग्राहक बाजाराकडे फिरकलेच नव्हते. यामुळे आवक कमी प्रमाणात होऊनही दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती़ मंगळवारी मात्र या परिस्थितीमध्ये बदल झाला असून, नेहमीच्या तुलनेत 70 ते 75 टक्के इतकी आवक झाली आहे. बाजारात तेजी आली, त्यामुळे दरामध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली.

भाज्यांचे दर 80 ते 100 रुपयांवर!
मार्केटयार्डात मंगळवारी नेहमीच्या तुलनेत 70 ते 75 टक्के इतकी भाजीपाल्याची आवक झाली होती. घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली होती. किरकोळ बाजारातील दर काही प्रमाणात उतरतील, अशी अपेक्षा होती; मात्र शहरासह उपनगरांमध्ये भाज्यांचे दर व्यापार्‍यांनी उतरु दिले नाहीत. कांदा, बटाटा वगळता सर्वच भाज्या 80 ते 100 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात होती.

तर कोलमडेल महिन्याचे बजेट!
जर याच भावात काही दिवस भाजी विकत घेतली तर महिन्याचे सगळे बजेट कोलमडणार आहे. किरकोळ विक्रते अव्याचा सव्वा भाव घेत आहे. सरकारने यावर काही तरी तोडगा काढून ही समस्या सोडवायला हवी.
सायली कोंडे, गृहिणी