पुणे : शहरातील मॉल्स, पेट्रोल पंप तसेच हॉटेल परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात असाल तर पिंपरी-चिंचवडकर आणि पुणेकरांनो सावधान! कारण, एटीएम मशीनमध्ये चोरट्यांकडून स्टिमर हे स्वॉफ्टवेअर बसवलेले असू शकते. त्यामाध्यमातून आपल्या डेबिट किंवा क्रेडिटकार्डची माहिती चोरली जात असून, तिचे नंतर क्लोनिंग करून नवे एटीएम कार्ड बनवले जाते व त्याद्वारे आपणास चुना लावला जाऊ शकतो. पुणे शहरात वास्तव्य करणार्या दोन नायझेरियन तरुणांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी हे स्टिमर स्वॉफ्टवेअर बसवल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एटीएममधून पैसे काढताना काळजी घेण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. ऑकवेहॅश फॉरच्युश (रा. पिंपळे गुरुव) व बशीर डाकिन गारी उस्मान (वय 26, रा. पिरंगुट, मूळ. नायझरिया) अशी या अटकेतील दोघा भामट्यांची नावे आहेत. दोघेही पुण्यात स्टुडंट व्हिजावर आले आहेत.
…असे तयार होते बनावट कार्ड
ऑकवेहॅश फॉरच्युश याचा एक वर्षापूर्वी व्हिजा संपला आहे. तर, बशीर उस्मान याचा दोन वर्षापूर्वी व्हिजा संपला आहे. तरीही हे दोघे शहरात वास्तव्य करत होते. ऑकवेहॅश हा शिक्षण घेत असल्याचे पोलिसांना सांगत आहे. तर, बशीर हा काम करत असल्याचे सांगत आहे. दरम्यान ही आंतरराष्ट्रीय टोळी असून, त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून काही मशीन्स तसेच ब्लँककार्ड जप्त केले आहेत. त्यामुळे त्यांनी दुसर्या पद्धतीनेही गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शहरातील हॉटेल्स, मॉल्स व पेट्रोल पंपाजवळ असणार्या एटीएम मशीनमध्ये स्टिमर हे स्वॉफ्टवेअर (स्टिमर हे स्कॉनिंग करणारे स्वॉफ्टवेअर आहे) बसवले जाते. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी नागरिक डेबिट किंवा क्रेडिटकार्ड मशीनमध्ये टाकतात. पैसे काढल्यानंतर किंवा व्यवहार पूर्ण करुन जातात. तत्पूर्वी, मशीनमध्ये कार्ड टाकल्यानंतर त्यांच्या कार्डची माहिती स्वॉफ्टवेअरवर सेव्ह झालेली असते. त्यानंतर दोघे हे स्टिमर तेथून काढून घेऊन जातात. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून क्लोनिंगकरुन बनावट कार्ड तयार करतात.
शहरातील अनेक एटीएममध्ये स्टिमर, शोध सुरु!
ऑकवेहॅश फॉरच्युश व बशिर डाकिन गारी उस्मान यांच्याकडून 20 डेबिटकार्ड, 7 क्लोनिंग केलेली कार्ड, 8 मोबाईल, 2 डोंगल, 2 पेनड्राईव्ह, लॅपटॉप जप्त केला आहे. मात्र, त्यांनी शहरात नेमके कोठे-कोठे हे स्टिमर बसवले आहेत, याबाबत पोलिस आता तपास करत आहेत. त्यांच्याकडून अद्याप तरी माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनाही तपासात अडचणी येत आहेत. एटीएममध्ये गेल्यानंतर मशीनवर पिन होल कॅमेरा लावण्यात आला आहे का? याची खात्री करावी. आपण पासवर्ड टाकत असताना तो कॅमेरा किंवा कुणाच्या नजरेत येणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही ठिकाणी कार्डद्वारे स्वाईप करताना स्वाईप मशीनला वेगळा स्लॉट बसविला आहे का? याची खात्री करावी. तसेच पेमेंट करत असताना पासवर्ड दिसेल किंवा पासवर्ड सांगून पेमेंट करु नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.