पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रकल्पांची सूत्रे मुख्यमंत्र्यांच्या हाती!

0

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना पुन्हा एकदा शह देत, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्पांची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली आहेत. पुण्यात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात ‘वॉर रुम’च तयार केला असून, ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकारीवर्गाकडून नियमित अहवाल घेत असल्याची माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. ज्या प्रकल्पांत खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे, त्यात प्रामुख्याने पुणे मेट्रो प्रकल्प, शिवाजीनगरच्या गोदामाची जागा हस्तांतरण, कोथरुडमधील कचरा डेपो, महामेट्रोसाठी स्वारगेट येथे जागा आदी प्रकल्पांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील काही प्रकल्पांतही मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घातले आहे. पुणे मेट्रो प्रकल्प त्वरित गतीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याचेही सूत्र म्हणाले. राजकीय खोळंबा टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे हे प्रयत्न असून, भाजपअंतर्गत वादाचा फटका विकास प्रकल्पांना बसू नये, याची काळजीही मुख्यमंत्री घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांचा व्हीसीद्वारे अधिकार्‍यांशी संवाद
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निगरानीखाली तयार करण्यात आलेल्या वॉर रुममधून सातत्याने आढावा घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते या कामांवर लक्ष ठेवून असून, संबंधित अधिकार्‍यांशी मुख्यमंत्री स्वतः संवाद साधतात, अशी माहितीही वरिष्ठ अधिकारी सूत्राने दिली. शिवाजीनगर गोडावूनची जागा हस्तांतरण, कोथरूड येथील कचरा डेपो प्रकल्प, स्वारगेट येथे महामेट्रोसाठी जागा उपलब्ध करणे आदी विकासकामांवर स्वतः मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शिवाजीनगर येथील गोडावूनची जागा महामेट्रोकडे हस्तांतरणाबाबत थेट मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असून, जागेच्या हस्तांतरणाबाबत महामेट्रोला फारशा अडचणी येणार नाहीत, अशी माहितीही जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांनी दोन ठळक निर्णय घेतले आहेत. एक तर महामेट्रोला लागणार्‍या जागा तातडीने हस्तांतरित करणे, आणि दुसरे म्हणजे स्वारगेट येथे मल्टि मोडल हब उभे करणे. तूर्त तरी हे दोन प्रश्न मार्गी लागल्यात जमा आहे.

वनाज येथील पुतळ्याचा वादही सुटणार?
पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले, की कोथरूडमधील वनाज येथील जागेबाबत तूर्त राजकीय वाद निर्माण झालेला आहे. हा वाद सोडविण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रयत्न करत आहेत. महामेट्रोचे काम एकदा पूर्णक्षमतेने सुरु झाले की हा वादही सोडविला जाईल, अशी अपेक्षा आहे. वादग्रस्त जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याने तो हटविण्यावरून राजकीय वाद आहेत. महामेट्रोच्याआड येणारा हा पुतळा अन्यत्र हटवावा लागणार आहे. हा वाद मुख्यमंत्री कसा सोडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुढील सहा महिन्यात स्वारगेट येथे ट्रान्स्फोर्ट हब उभारले जाणे अपेक्षित असून, त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राज्य परिवहन आणि पीएमपीएमएलच्या वाहतुकीस अडथळा न आणता हे काम पूर्ण करायवयाचे असल्याने प्रशासनाची कसोटी लागली आहे. स्वारगेट येथे महामेट्रोचे स्टेशन अंडर ग्राउंड असेल, अशी माहितीही महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांनी दिली आहे.