पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 39 पदाधिकार्‍यांचे जात प्रमाणपत्र बोगस!

0

पुणे : उद्योगपती आणि माहिती अधिकार कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी अत्यंत खळबळजनक प्रकार उघडकीस आणला आहे. पुणे महापालिकेच्या 18, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 17 आणि जिल्हा परिषदेच्या तीन अशा एकूण 39 लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती देऊन बोगस जात प्रमाणपत्र मिळवून त्याचा वापर निवडणूक लढविण्यासाठी केला आहे. यात सर्वाधिक 26 लोकप्रतिनिधी भाजपचे असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. त्यामध्ये माजी महापौर आणि उपमहापौरांचाही समावेश असल्याचे मृणाल पाटील यांनी सांगितले. बहुतांश नगरसेवकांनी चुकीची माहिती देऊन कुणबी जात प्रमाणपत्र घेतल्याची तक्रार ढोले-पाटील यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. तसेच कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रमाणपत्राची चौकशी आणि तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी समितीकडे केली होती.

धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर धनकवडे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा लेखी आदेश काढला आहे. किशोर धनकवडे हे प्रभाग 39 अ मधून मागास प्रवर्गातून निवडून आले होते. त्यांनी महापालिका निवडणुकीत सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र निवडणुकीच्यावेळी सादर केले होते. मात्र ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमारांकडे मंजुरीसाठी देण्यात आला होता. बहुतांश नगरसेवकांनी चुकीची माहिती देऊन कुणबी जात प्रमाणपत्र घेतल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रमाणपत्राची चौकशी आणि तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी समितीकडे केली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे धनकवडे यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जावर समितीपुढे गेल्या महिन्यात सुनावणी झाली. त्यांनी सादर केलेला कुणबी जातीचा दाखला समितीकडून अवैध ठरवण्यात आला होता.

कोण आहेत मृणाल ढोले पाटील?
32 वर्षीय उद्योगपती आणि माहिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या मृणाल ढोले यांनी याबाबत तक्रार केली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्ह ापरिषदेचे निवडणूक लढवणार्‍या नगरसेवकांच्या जात पडताळणीची त्यांनी मागणी केली आणि हा प्रकार उघडकीस आला. आश्चर्य म्हणजे, पुणे महापालिकेचे 18, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 17 आणि जिल्हा परिषदेचे तीन असे एकूण 39 लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे बोगस जात प्रमाणपत्राचा आधार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यात सर्वाधिक 26 लोकप्रतिनिधी भाजपचे असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. त्यामध्ये माजी महापौर आणि उपमहापौरांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त भाजपच्या दबावाखाली : किशोर धनकवडे
जात पडताळणी प्रकरणी मी न्यायालयात दाद मागितली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत आहे. याप्रकरणी मी उच्च न्यायालयात दाद मागितली असून, येत्या 10 जुलैला न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालयाने महापालिकेला बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. असे असताना आयुक्त कुणाल कुमार यांनी आकसाने आणि भाजपच्या दबावाखाली माझे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया किशोर धनकवडे यांनी दिली आहे. भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही. यावरूनच आयुक्त भाजपच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनकवडे यांनी सांगितले.